देहूगावात बीजसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त.पोलिस प्रशासनाची सखोल पाहणी वाहतूक गर्दी नियंत्रणाचा स्वतंत्र आराखडा
देहूगावात बीजसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त.पोलिस प्रशासनाची सखोल पाहणी वाहतूक गर्दी नियंत्रणाचा स्वतंत्र आराखडा
देहूगाव : वारकरी संप्रदायाच्या भावविश्वाचा केंद्रबिंदू असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या बीजसोहळ्यानिमित्त देहूनगरीत भक्तिरस ओसंडून वाहू लागला आहे. लाखो भाविकांच्या आगमनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आराखडा तयार केला असून संवेदनशील ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीची चाचपणी केली. पालखी मार्ग, मुख्य मंदिर परिसर तसेच चौदा टाळकरी कमान ते वैकुंठस्थान मंदिर या संपूर्ण पट्ट्यात बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
बीजसोहळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान करते. या वेळी भक्तांच्या गर्दीला अक्षरशः ऊत येतो. पालखी प्रस्थानापासून ते पुनरागमनापर्यंतचा संपूर्ण मार्ग सुरक्षा कवचात राहणार आहे. गर्दीचे नियोजन, आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद, तसेच भाविकांच्या हालचाली सुरळीत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी बॅरिकेडिंग, मार्गदर्शक फलक आणि स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. २८) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देहूगाव परिसराचा सविस्तर आढावा घेतला. अप्पर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलिस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पालखी मार्गावरील प्रमुख चौक, पार्किंग स्थळे, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, तसेच आपत्कालीन सेवा मार्गांची पाहणी केली. देहू देवस्थान ट्रस्टचे विश्वस्तही या पाहणीत सहभागी झाले होते.
सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असून दंगा नियंत्रण पथक आणि जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. महिला भाविकांची संख्या लक्षात घेऊन महिला पोलिसांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. सार्वजनिक सूचना प्रणालीद्वारे गर्दीचे नियोजन आणि दिशादर्शन केले जाणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा लागू करण्यात येणार असून जड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. भाविकांच्या वाहनांसाठी नियोजित पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र ग्रीन कॉरिडॉर राखीव ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
बीजसोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी पोलिस, स्थानिक प्रशासन आणि देवस्थान यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले. भक्तिमय वातावरणात देहूनगरी सज्ज झाली असून बीजसोहळ्यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.





