ताज्या घडामोडीशहरसामाजिक

पिंपरी-चिंचवडचा कचरा तळेगावात:मध्यरात्री कचऱ्याने भरलेले तीन ट्रक पकडले: कारवाईची मागणी


पिंपरी-चिंचवडचा कचरा तळेगावात:मध्यरात्री कचऱ्याने भरलेले तीन ट्रक पकडले: कारवाईची मागणी

 

तळेगाव दाभाडे :

 

तळेगाव दाभाडे शहरात पिंपरी-चिंचवड परिसरातील कचरा अनधिकृतपणे टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कचऱ्याने भरलेले तीन ट्रक स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुहास गरुड यांनी पकडून दिल्याची घटना घडली. हे ट्रक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) हद्दीतून कचरा घेऊन तळेगावात आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मोरखळा येथील कचरा डेपो परिसरात रात्री उशिरा तीन ट्रक कचरा टाकण्यासाठी दाखल झाले होते. संशयास्पद हालचाल लक्षात आल्याने पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रक अडवले. तपासणी केल्यानंतर तिन्ही ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे आढळून आले. हा कचरा पिंपरी-चिंचवड परिसरातून आणण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

या घटनेची माहिती तात्काळ तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) यांना देण्यात आली. नगराध्यक्ष संतोष दाभाडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते तळेगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असताना बाहेरील शहरातून कचरा आणून टाकण्याचा प्रयत्न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी संबंधित ट्रक चालकांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी शहराच्या हद्दीत कचरा टाकण्याच्या प्रकारांवर प्रशासनाने लक्ष ठेवावे, अशीही मागणी होत आहे.

 

या संदर्भात बोलताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी सांगितले की या प्रकरणाबाबत मी स्वतः पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. त्यांच्या हद्दीतील कचरा तळेगावात टाकला जात असल्याची बाब त्यांच्यासमोर मांडणार आहोत. तसेच भटकी कुत्रीही तळेगाव शहरात आणून सोडली जात असल्याची तक्रार आहे. हा प्रकार तात्काळ थांबवला नाही, तर तोच कचरा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दालनात आणून टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

  1. दरम्यान, या घटनेमुळे तळेगाव शहरात स्वच्छतेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू झाली असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *