लोककलेचा सन्मान; लोकशाहीर बिरुदेव एडके यांना ‘हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन पुरस्कार’
लोककलेचा सन्मान; लोकशाहीर बिरुदेव एडके यांना ‘हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन पुरस्कार’
सोलापूर :प्रतिनिधी(माऊली पवार.पाटील.(७७५७९१५८५५)
धनगर समाजाची समृद्ध परंपरा, लोककला आणि हालमत संप्रदायाची सांस्कृतिक ओळख आपल्या पहाडी आवाजातून, ओवी गायनातून आणि ढोलाच्या निनादात जनमानसात रुजवणारे प्रसिद्ध लोकशाहीर बिरुदेव एडके यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सांगली येथील हालमत संस्कृती संवर्धन संस्था यांच्या वतीने हा सन्मान सोहळा हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी लोकशाहीर बिरुदेव एडके यांचा त्यांच्या पत्नी शामल एडके यांच्यासह मंचावर सन्मान करण्यात आला. डॉ. सुषमा पुजारी, सोनाली उद्योग समूहाचे संदीप कारंडे, सिद्धाप्पा गावडे तसेच वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप पारंपरिक आणि सन्मानपूर्ण असे होते. यामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, कोल्हापुरी फेटा, घोंगडी व श्रीफळ यांचा समावेश होता. धनगर संस्कृतीत घोंगडी व फेटा यांना विशेष महत्त्व असल्याने हा सन्मान एडके यांच्यासाठी भावनिक ठरला. हालमत संप्रदायातील ओव्या, लोकगीते व लोककथा जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे केले आहे.
हालमत संस्कृती संवर्धन संस्था गेल्या नऊ वर्षांपासून धनगर समाजाच्या लोकसंस्कृतीचे जतन करणाऱ्या कलावंतांचा गौरव करत आहे. यंदा लोकशाहीर बिरुदेव एडके यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याने लोककला क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे. हा सन्मान केवळ एका कलाकाराचा नसून, संपूर्ण लोकसंस्कृतीचा गौरव असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या सोहळ्याला एडके यांचे कुटुंबीय तसेच बळीराम क्षिरसागर, पांडुरंग घोडके आदी निकटवर्तीय उपस्थित होते. पांडुरंग घोडके यांनी एडके यांच्या कलाप्रवासातील योगदानाचा विशेष उल्लेख केला.
आधुनिक युगात मूळ संस्कृती हरवत चालली असताना, बिरुदेव एडके यांच्यासारखे लोकशाहीर ग्रामीण भागातील कला जिवंत ठेवत असल्याचे प्रतिपादन शाहिर सागर माने यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना लोकशाहीर बिरुदेव एडके भावूक झाले. “हा पुरस्कार माझ्या कलेला मिळालेली पावती आहे. कुलदैवतांची ओवी गायन हीच माझी ओळख असून शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या संस्कृतीचा प्रसार करणार,” असे त्यांनी सांगितले.
या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





