महत्त्वाचेशहर

तळेगाव दाभाडे शहरावर तृतीय नेत्राची करडी नजर .८६ सीसीटीव्हींच्या जाळ्याने शहर सुरक्षेला नवे कवच


तळेगाव दाभाडे शहरावर तृतीय नेत्राची करडी नजर .८६ सीसीटीव्हींच्या जाळ्याने शहर सुरक्षेला नवे कवच

तळेगाव दाभाडे :
शहराच्या सुरक्षिततेला आधुनिक तंत्रज्ञानाची ढाल देत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने सीसीटीव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून ठोस पावले उचलली आहेत. वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि वाहतूक कोंडी यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील २९ प्रमुख ठिकाणी ३३ खांबांवर तब्बल ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यापैकी ५६ कॅमेरे सध्या कार्यान्वित झाले असून उर्वरित कॅमेरेही लवकरच ‘डोळे उघडणार’ आहेत.

२०२५ मध्ये हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम जानेवारीअखेर पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. सीसीटीव्ही बसविल्यानंतर पुढील दोन वर्षे संबंधित कंत्राटदाराकडून देखभाल करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी वार्षिक देखभाल कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी ७३ लाख ७२ हजार ७३३ रुपयांची तरतूद करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने ही रक्कम अदा केली जाणार आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी १ कोटी ६३ लाख ८३ हजार ८५३ रुपये खर्च अपेक्षित आहे.

या प्रकल्पामुळे शहरावर पोलिस प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. सीसीटीव्हीद्वारे सातत्यपूर्ण देखरेखीसाठी दोन अत्याधुनिक नियंत्रण कक्ष (सर्व्हर रूम) उभारण्यात येत आहेत. तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे मुख्य नियंत्रण कक्षाची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून, सुभाष चौक येथे दुसऱ्या नियंत्रण कक्षाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या विद्युत विभागाच्या अभियंता स्मिता म्हस्के यांनी दिली.

घोरावडी रेल्वे स्टेशन रोड. गणपती चौक, डोळसनाथ मंदिर, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक, लिंब फाटा, पाताळेश्वर मंदिर, मौलाई मंदिर, बेटी बचाव पुतळा, खांडगे पेट्रोल पंप, स्टेशन चौक, सेवाधाम हॉस्पिटल, नूतन कॉलेज, स्वराज नगरी, तळेगाव एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, मराठा क्रांती चौक, इंद्रायणी कॉलेज, माळवाडी, तळेगाव बॉर्डर, डीपी रोड आदी ठिकाणी कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. तर कातवी रोड, मस्करनेस कॉलनी, आंबेडकर कमान, भेगडे तालीम, भेगडे वॉशिंग सेंटर, इंद्रायणी कॉलेज मेन गेट येथील काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या तृतीय नेत्र यंत्रणेमुळे तळेगाव दाभाडे अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून पुढे येईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *