राजकीयशहर

भाजप नोंदणीपासून विस्तारापर्यंत रवींद्र माने यांचे भरीव योगदान. स्वीकृत सदस्यपदाची जोरदार मागणी


भाजप नोंदणीपासून विस्तारापर्यंत रवींद्र माने यांचे भरीव योगदान. स्वीकृत सदस्यपदाची जोरदार मागणी

तळेगाव दाभाडे :

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीकरणात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, अशा कार्यकर्त्यांमध्ये रवींद्र बाळासाहेब माने यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. भाजप सदस्य नोंदणी अभियान असो वा पक्ष विस्ताराची जबाबदारी रवींद्र माने यांनी प्रत्येक टप्प्यावर पक्षनिष्ठेचा आदर्श निर्माण केला आहे. तळेगाव दाभाडे शहरात भाजपाची पायाभरणी मजबूत करण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक राहिलेले व संघात अनेक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडणारे रवींद्र माने हे
सामान्य नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणारे, संकटसमयी मदतीचा हात पुढे करणारे आणि पक्षासाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ता अशीच रवींद्र माने यांची ओळख आहे. भाजप पक्ष विस्तारक म्हणून त्यांनी केलेले काम केवळ आकड्यांत मोजता येणारे नाही, तर ते जनमानसात खोलवर रुजलेले आहे. पक्ष सदस्य नोंदणी मोहिमेदरम्यान त्यांनी शेकडो नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडले, तसेच विचारधारेशी निष्ठावान राहण्याचे संस्कार रुजवले.

राजकारणात आमिषे, दबाव आणि संधींचे गणित नेहमी बदलते; मात्र विरोधकांनी अनेक वेळा संपर्क साधूनही रविद्र माने यांनी आपल्या भाजपावरील प्रेमाशी तडजोड केली नाही. सत्ता, पद किंवा वैयक्तिक लाभापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणारा हा निष्ठावंत कार्यकर्ता आजही तितक्याच ऊर्जेने पक्षासाठी कार्यरत आहे.

महायुतीच्या जागावाटपात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक ९ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने माने यांनी मोठा निर्णय घेतला. शेकडो समर्थकांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह धरला असतानाही, पक्षहिताला बाधा नको म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. अर्ज ठेवून सौदेबाजी करता आली असती; मात्र पक्षाच्या शिस्तीला आणि निष्ठेला धक्का नको म्हणून मी तो मार्ग स्वीकारला नाही. अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.

मात्र, पक्षासाठी आयुष्याची अनेक वर्षे खर्ची घालूनही गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुर्लक्षित करण्याचे प्रयत्न होत असल्याची भावना माने यांनी व्यक्त केली आहे. अध्यक्षपदाच्या काळातील कटू अनुभव असूनही त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहणे पसंत केले. “राजकारणात उपयोगीतेपेक्षा उपद्रवमूल्याला किंमत दिली जाते, हे माहित असूनही मी पक्षहिताचाच विचार केला अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, तळेगाव दाभाडे शहरातील अनेक पक्षनिष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी एकमुखी मागणी केली आहे की, भारतीय जनता पक्षाने रवींद्र माने यांच्या योगदानाची योग्य दखल घ्यावी. त्यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता शहरात होत आहे.

पक्षासाठी रक्त आटवून काम करणाऱ्या, विचारधारेशी तडजोड न करणाऱ्या आणि संघटन उभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळणार का, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *