महत्त्वाचेशहर

पीएमपीएलमध्ये ‘ज्वालाग्राही बेफिकिरी सोमाटणे बसथांब्यावर प्रवाशांच्या जीवावर उठलेला सिलिंडर प्रवास


पीएमपीएलमध्ये ‘ज्वालाग्राही बेफिकिरी सोमाटणे बसथांब्यावर प्रवाशांच्या जीवावर उठलेला सिलिंडर प्रवास

सोमाटणे (मावळ) : सार्वजनिक वाहतुकीची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना सोमाटणे बसथांब्यावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने ही जबाबदारी किती तोकडीपणे पाळली जाते, याचे विदारक दर्शन घडवले. सोमवारी, १९ जानेवारी रोजी, पीएमपीएलच्या एका प्रवासी बसमधून घरगुती गॅस सिलिंडर सर्रासपणे वाहून नेण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. नियम, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता सुरू असलेला हा ‘ज्वालाग्राही प्रवास’ पाहून बसमधील प्रवासी हादरून गेले.

ज्वलनशील गॅस सिलिंडरसारखी अत्यंत धोकादायक वस्तू सार्वजनिक प्रवासी वाहनातून वाहून नेण्यास स्पष्ट मनाई असतानाही एका इसमाने कोणतीही भीड न बाळगता हा सिलिंडर बसमध्ये चढवला. विशेष म्हणजे, बसमध्ये चालक व वाहक उपस्थित असतानाही हा प्रकार रोखण्यात आला नाही. त्यामुळे नियम आहेत तरी कुणासाठी? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येथे केवळ दुर्लक्षितच नव्हे, तर अक्षरशः तुडवला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, गॅस सिलिंडर बसमध्ये असणे म्हणजे चालता-बोलता मृत्यूचे निमंत्रणच. अचानक ब्रेक लागणे, रस्त्यावरील खड्डे, धक्के किंवा किरकोळ अपघात घडल्यास सिलिंडरमधून गॅस गळती होऊन भीषण स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा स्फोट झाला असता, तर केवळ बसमधील प्रवासीच नव्हे, तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांतील नागरिक, पादचारी आणि परिसरातील दुकाने यांनाही त्याची झळ बसली असती. एका क्षणात संपूर्ण रस्ता आगीत होरपळण्याचा धोका या निष्काळजीपणातून स्पष्ट दिसून येतो.

पीएमपीएल ही पुणे-मावळ परिसरातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे या सेवेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहकाची जबाबदारी ही फक्त तिकीट काढण्यापुरती मर्यादित नसून, प्रवाशांच्या सुरक्षिततेची पहारेकरी म्हणून काम करण्याची आहे. मात्र, येथे ‘चालतंय’ आणि ‘कुणाला काय फरक पडतो’ या मानसिकतेने नियमांना हरताळ फासण्यात आल्याचे चित्र आहे.

या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. सार्वजनिक प्रवासी वाहनातून गॅस सिलिंडर वाहून नेणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकाराला मूक संमती देणारे चालक आणि वाहक हेही तितकेच जबाबदार आहेत. एखादी दुर्घटना घडली असती, तर शेकडो निष्पाप प्रवाशांचे प्राण गेले असते. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.अशी ठाम मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या घटनेनंतर प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीएमपीएल प्रशासनाने केवळ चौकशीचे आदेश न देता प्रत्यक्षात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नियम कागदावरच राहिले, तर ‘सार्वजनिक वाहतूक’ सुरक्षित राहणार नाही. अन्यथा हा ‘गॅसचा जीवघेणा प्रवास’ कधी कुणाच्या आयुष्याचा शेवट ठरेल, हे सांगता येणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *