आरोग्य

कामे मंजूर असूनही रखडली तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड


कामे मंजूर असूनही रखडली तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड

तळेगाव दाभाडे : शहराच्या मध्यवर्ती भागालगत असलेल्या जोशीवाडी-ठाकरवाडी परिसराकडे नगरपरिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक विकासकामांना मंजुरी मिळूनही ती प्रत्यक्षात राबवली जात नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आम्हीही माणसेच आम्हाला मूलभूत सुविधा का मिळत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सुमारे शंभर वर्षांपासून या भागात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था, सांडपाणी निचरा, रस्त्यांची दुरवस्था, तसेच पुरेशा प्रकाशयोजनेचा अभाव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, गटार दुरुस्ती आणि स्ट्रीटलाईट बसविण्याची कामे मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरुवातच झालेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल व साचलेले पाणी यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आतपर्यंत येऊ शकत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी लवकरच आंदोलनाचा इशारा दिला असून, मंजूर कामांचा तातडीने आढावा घेऊन ती पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने या बाबत स्पष्ट भूमिका मांडून कामांचा कालबद्ध आराखडा जाहीर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. नागरिकांच्या वाढत्या संतापामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *