तळेगावातील तलावात सांडपाण्याचा मारा; पर्यावरण धोक्यात, तातडीने कारवाईची मागणी
तळेगावातील तलावात सांडपाण्याचा मारा; पर्यावरण धोक्यात, तातडीने कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे :
नगरपालिका हद्दीतील गाव भागातील ऐतिहासिक तलावात कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी तात्काळ बंद करावे, अशी ठाम मागणी नियोजन व विकास समितीचे सभापती दीपक भेगडे यांनी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात येत असून नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दीपक भेगडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपालिका हद्दीतील सांडपाणी कोणत्याही प्रकारचे शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट गाव भागातील तलावात सोडले जात आहे. परिणामी तलावातील पाणी दूषित होत असून जलस्रोताची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
सांडपाणी प्रक्रिया न करता थेट तलावात सोडणे हे पर्यावरणीय नियमांचे उघड उल्लंघन आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय व आरोग्यविषयक संकट निर्माण होऊ शकते,असा इशारा भेगडे यांनी दिला आहे. तलावातील जैवविविधतेवरही याचा विपरीत परिणाम होत असून तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर तलावात सोडले जाणारे पाणी पूर्णपणे प्रक्रिया करूनच सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना स्वतंत्र एसटीपी प्लांट सुरू करणे बंधनकारक करण्यात यावे, अशीही सूचना त्यांनी प्रशासनाला केली.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कृषी पणन मंडळाकडून यापूर्वीही नगरपरिषदेला याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस व प्रभावी कारवाई झालेली नाही, अशी नाराजी दिपक भेगडे यांनी व्यक्त केली आहे.
तलाव प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तलाव हा गावाचा जीवनाधार आहे. तोच दूषित होत असेल तर भविष्यात पाण्याची मोठी टंचाई भासू शकते, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तज्ञांच्या मते, अशा प्रकारे सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडल्यास केवळ पाणीच नव्हे तर संपूर्ण परिसंस्था बाधित होते. त्यामुळे प्रशासनाने विलंब न लावता तातडीने योग्य ती प्रक्रिया यंत्रणा उभारून प्रदूषणावर आळा घालणे गरजेचे आहे.
एकूणच, तलावाचे रक्षण आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.





