आरोग्य

मारुती मंदिर चौकातील फुटके चेंबर व अरुंद रस्त्याने नागरिक त्रस्त


मारुती मंदिर चौकातील फुटके चेंबर व अरुंद रस्त्याने नागरिक त्रस्त

तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर चौक परिसरात नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या चौकासमोरील पंचशीलनगर (नीलकंठ नगर) प्रवेशद्वाराजवळ अनेक वर्षांपासून फुटलेल्या चेंबरमुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन धोक्याच्या छायेत गेले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांची वस्ती असलेल्या या भागात एक-दोन इमारतींमध्ये देखील अनेक नागरिक वास्तव्यास असून ये-जा करण्यासाठी केवळ एकच अरुंद रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्यावरून एकावेळी एकच वाहन जाऊ शकते, त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघाताची भीती कायमच डोक्यावर असते.

प्रवेशद्वाराच्या मधोमध असलेले फुटके चेंबर नागरिकांसाठी अक्षरश अपघातसापळा ठरत आहे. लहान मुले, महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना पायी जाताना सतत खाली पाहत चालावे लागते. रात्रीच्या वेळी तर हा धोका अधिकच तीव्र होतो. अनेकदा किरकोळ अपघात घडले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला सांडपाणी वाहून नेण्यासाठी नवीन सिमेंट पाईप आणून ठेवण्यात आले आहेत. मात्र, काम रखडल्याने हे पाईप रस्त्यावरच पडून राहिले आहेत. परिणामी मुख्य रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याच ठिकाणी PMPL चा बसथांबा असून अनेक प्रवासी बसची वाट पाहत उभे असतात. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने चेंबरची सुरक्षित दुरुस्ती करून पाईपलाईनचे काम पूर्ण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी एकमुखी भूमिका स्थानिकांनी देखील मांडली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *