तळेगाव दाभाडेतील बनेश्वर स्मशानभूमीतील अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये संताप
तळेगाव दाभाडेतील बनेश्वर स्मशानभूमीतील अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये संताप
तळेगाव दाभाडे : येथील बनेश्वर स्मशानभूमी परिसरात असलेल्या प्रवचन मंडप व अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी उभारलेल्या बसण्याच्या मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पवित्र आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मंडपाच्या छताला आणि कोपऱ्यांत कोळ्यांची जाळी मोठ्या प्रमाणावर साचली असून अनेक ठिकाणी जळमटे लटकताना दिसत आहेत. धूळ, कचरा आणि साचलेली घाण यामुळे परिसराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अंत्यसंस्कारासाठी दुःखी मनाने येणाऱ्या नातेवाईकांना या अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या वेदनेत आणखी भर पडत आहे.
प्रवचन मंडपात धार्मिक कार्यक्रम किंवा श्रद्धांजली सभांचे आयोजन केले जाते. मात्र स्वच्छतेअभावी येथे बसणेही कठीण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र दिसून येते. संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
स्मशानभूमी हे शेवटचे विसाव्याचे स्थान आहे. येथे किमान स्वच्छता आणि पवित्रता राखली गेली पाहिजे.अशी भावना एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली. सामाजिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या या ठिकाणी योग्य देखभाल न झाल्यास प्रशासनाविषयीचा विश्वास कमी होईल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या भावनांचा आदर राखत संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.





