महत्त्वाचे

तळेगाव दाभाडेत बेशिस्त बुलेटस्वारांवर पोलिसांचा ॲक्शन मोड


तळेगाव दाभाडेत बेशिस्त बुलेटस्वारांवर पोलिसांचा ॲक्शन मोड

 

तळेगाव दाभाडे : शहरात बेशिस्त बुलेटस्वार, फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून अनेक दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली असून मॉडिफाईड बुलेटवर कडक निर्बंध लादले आहेत.

शहरातील प्रमुख चौक, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच निवासी संकुलांच्या भागात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी वाढल्या होत्या. बुलेटच्या सायलेंसरमधून फटाक्यासारखा आवाज करणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे अशा प्रकारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांकडून शाळा व महाविद्यालय परिसरात दुचाकी घेऊन गोंधळ घालण्याच्या घटना समोर आल्या होत्या. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या.

वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. अचानक नाकाबंदी, कागदपत्रांची तपासणी आणि मॉडिफाईड सायलेंसर जप्त करण्याची कारवाई सुरू असून नियमभंग करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येत आहे. काही प्रकरणांत पालकांनाही समज देण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांतील वार्तांकन आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी अशा उपद्रवी चालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वाहतूक नियमांचे पालन करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनीही सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *