मावळच्या डोंगरदऱ्यांत वणव्यांचा कहर; वन्यजीव व वनसंपदेवर संकट
मावळच्या डोंगरदऱ्यांत वणव्यांचा कहर; वन्यजीव व वनसंपदेवर संकट
तळेगाव दाभाडे :
मावळ तालुक्यातील नाणे मावळ, पवन मावळ, आंदर मावळ या डोंगराळ भागांमध्ये उन्हाळा सुरू होताच वणव्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. लहान-मोठ्या डोंगररांगा, टेकड्या, दऱ्यांनी नटलेल्या या परिसरात औषधी वनस्पतींसह विविध प्रकारची जंगली झाडे तसेच अनेक वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. मात्र, कोरड्या हवामानामुळे झाडांचा पाला-पाचोळा साचल्यानंतर काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याने नैसर्गिक वनसंपदेवर गंभीर संकट ओढवले आहे.
वन्यजीव अभ्यासकांच्या माहितीनुसार, या वणव्यांमुळे दुर्मीळ औषधी वनस्पती, पक्षी आणि लहान प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी रात्रीच्या वेळी शिकारीसाठी आगी लावल्या जात असल्याचे आरोप पुढे येत आहेत. मोर, ससे, लांडोर यांसारख्या प्राण्यांना बाहेर काढून त्यांची शिकार करण्यासाठी वणव्यांचा वापर केला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तळेगाव दाभाडे परिसरातील उर्से ते बौर डोंगर भागात एक दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात जंगल जळून खाक झाले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यप्राणी वस्तीच्या दिशेने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मावळमधील अनेक डोंगरांमध्ये संध्याकाळच्या सुमारास आग लावण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचेही निदर्शनास येत आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वणवे रोखण्यासाठी डोंगराळ भागात जाळरेषा काढणे, वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने नियमित गस्त घालणे, तसेच संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई, दंड व कारावासाची तरतूद अमलात आणावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
वेळीच प्रभावी उपाययोजना राबविल्या नाहीत, तर वनसंपदेची अपरिमित हानी होऊन पर्यावरणीय संतुलन बिघडण्याचे दीर्घकालीन परिणाम मावळ परिसराला भोगावे लागतील, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.





