बधलवाडी येथे घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा.तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
बधलवाडी येथे घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा.तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
नवलाख उंब्रे(मावळ): दि. २ मार्च रोजी बधलवाडी (ता. मावळ, जि. पुणे) येथे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, एका २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
याबाबत फिर्यादी अनंत देवेंद्र रावण (वय ४४, पोलीस हवालदार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन सुभाष हिंगे (वय २०, रा. मिंढेवाडी, ता. मावळ, जि. पुणे; मूळ रा. धानोरा, पोस्ट चांगेफळ, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ मार्च रोजी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास नवलाख उंब्रे ते बधलवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस शांताराम बधाले यांच्या गाळ्यात ही कारवाई करण्यात आली. आरोपीला हा ज्वलनशील पदार्थ असल्याची पूर्ण जाणीव असतानाही आणि परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो हे माहिती असूनही, बिगरपरवाना घरगुती गॅस सिलेंडर साठवून ठेवत असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत एकूण ११ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये HP कंपनीचे प्रत्येकी ३० किलो वजनाचे दोन भरलेले घरगुती लाल रंगाचे सिलेंडर (किंमत ६,००० रुपये), एक १६ किलो वजनाचा रिकामा सिलेंडर (२,५०० रुपये), एक ५ किलो वजनाचा सिलेंडर (२५० रुपये), ३५ किलो क्षमतेचा Honda कंपनीचा इलेक्ट्रिक वजन काटा (१,५०० रुपये) तसेच गॅस रिफिलिंग सर्किट व साहित्य (१,००० रुपये) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम (माळुंगे विभाग) यांच्या सूचनेनुसार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई पार पाडली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक दिपक खरात, पोलीस हवालदार अनंत रावण, पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे, विनायक शेरमाळे व रमेश घुले यांचा सहभाग होता. पुढील तपास सुरू आहे.





