क्राईम

देहू फाट्यावर भररस्त्यात महिलेचा अश्लील धिंगाणा. पोलीस शिपायालाच दिली ऑफर दिघी पोलिसांची धडक कारवाई


देहू फाट्यावर भररस्त्यात महिलेचा अश्लील धिंगाणा: पोलीस शिपायालाच दिली ऑफर दिघी पोलिसांची धडक कारवाई

दिघी:
पिंपरी-चिंचवड : शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. देहू फाटा परिसरात एका ५२ वर्षीय महिलेने भररस्त्यात उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना अश्लील हावभाव करत अडवण्याचा प्रकार केला. धक्कादायक बाब म्हणजे तिने ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपायालाच अश्लील ऑफर दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकारानंतर दिघी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मंगळवार (४ मार्च) रोजी दुपारी सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास देहू फाटा-डुडुळगाव रोडवरील बंन्सीलाल कापड दुकानाजवळ घडला. त्या वेळी परिसरात गस्त घालत असलेले पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते. त्याचवेळी संबंधित महिला सार्वजनिक रस्त्यावर उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना अश्लील इशारे करत थांबवत होती. काहींना ती जवळ बोलावत होती, तर काहींना उघडपणे अश्लील प्रस्ताव देत होती. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

घटनेचा कळस तेव्हा झाला, जेव्हा तिने ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपायालाच थांबवत चल येतोस का ५०० रुपये दे, चांगली सर्विस देते असे अश्लील शब्द उच्चारले. भरदिवसा, गर्दीच्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिकही चक्रावून गेले. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अश्लील वर्तन केल्याने सार्वजनिक सभ्यतेचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध ‘अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६’ (PITA Act) च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सार्वजनिक रस्त्यावर अश्लील हावभाव करून नागरिकांना अडवणे, त्यांना त्रास देणे तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणे असे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिलेला भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५ (३) नुसार नोटीस बजावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या अनैतिक कृत्यांवर आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस दलाने आता अधिक सतर्क भूमिका घेतली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या अशा उपद्रवी प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या घटनेमुळे देहू फाटा परिसरात काही काळ चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *