उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नगरपरिषदेचा दंडबडगा तळेगाव दाभाडेत स्वच्छतेसाठी कडक मोहीम
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नगरपरिषदेचा दंडबडगा तळेगाव दाभाडेत स्वच्छतेसाठी कडक मोहीम
तळेगाव दाभाडे : शहर स्वच्छतेच्या लढ्याला अधिक धार देत तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरूवार (दि. ५ मार्च) पासून या कारवाईला औपचारिक सुरुवात करण्यात आली असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात येत आहे.
नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांच्या सूचनेनुसार शहरातील विविध भागांत पाहणी करून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाने स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव हा ध्यास घेतला असून नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील रस्ते, मोकळी मैदाने, नाल्यांच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी नगरपरिषदेचे पथक सक्रिय झाले आहे. स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे आणि दत्तात्रय ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विविध परिसरात भेट देत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. शहर समन्वयक शुभम चौकटे तसेच स्वच्छता पर्यवेक्षक राहुल आगळे यांनीही या मोहिमेत सहभागी होत जनजागृतीस हातभार लावला.
या मोहिमेद्वारे नागरिकांना कचरा व्यवस्थापनाचे नियम समजावून सांगण्यात येत असून घरगुती कचरा ओला व सुका अशा प्रकारे वेगळा करून नगरपरिषदेच्या संकलन वाहनातच देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
- दरम्यान, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी केले आहे.





