आरोग्य

वडगावात निर्मळ जलयुगाची नांदी; दुहेरी शुद्धीकरण प्रकल्पांनी पाणीपुरवठ्याला नवी गती


वडगावात निर्मळ जलयुगाची नांदी; दुहेरी शुद्धीकरण प्रकल्पांनी पाणीपुरवठ्याला नवी गती

वडगाव(मावळ): शहराच्या पाणीव्यवस्थापनात आमूलाग्र बदल घडविणारा निर्मळ जलयुगाचा प्रारंभ शुक्रवारी प्रत्यक्षात उतरला. महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील शिंदेटेकडी (२ MLD) व संस्कृती (२ MLD) या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रांचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. माळीनगर येथील शिंदेटेकडी प्रकल्प परिसरात सकाळी ११ वाजता झालेल्या या सोहळ्याने वडगावच्या विकास प्रवासात जलसंपन्न अध्यायाची भर पडली.

मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन झाले. नगराध्यक्षा सौ. अबोली मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती सुनील गणेश ढोरे यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

या सोहळ्यात अजय बाळासाहेब म्हाळसकर, दिनेश गोविंद ढोरे, अर्चना संतोष म्हाळसकर, गणेश सोपान म्हाळसकर, सुनिता राहुल ढोरे, पुनम विकी भोसले, रूपाली अतुल ढोरे, अजय महेंद्र भवार, आकांक्षा योगेश वाघवले, अनंता बाळासाहेब कुडे, माया अमर चव्हाण, रोहित मंगेश धडवले, विशाल वसंतराव वहीले, सारिका प्रशांत चव्हाण, वैशाली गौतम सोनवणे, राणी संतोष म्हाळसकर यांसह माजी नगरसेवक पंढरीनाथ राजाराम ढोरे व संदीप भास्करराव म्हाळसकर आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

उद्घाटनानंतर बोलताना आमदार सुनील शेळके यांनी, शुद्ध आणि पुरेशा पाण्याची उपलब्धता ही शहराच्या आरोग्यदायी प्रगतीची किल्ली आहे. या प्रकल्पांमुळे वडगावच्या जलपुरवठा व्यवस्थेत दर्जात्मक उंची प्राप्त होईल,असे सांगितले. शिंदेटेकडी प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी म्हाळसकर कुटुंबियांचे विशेष आभार मानले. तसेच ईगल इन्फ्रा या ठेकेदार संस्थेने, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरपंचायत प्रशासनाच्या समन्वयातून प्रकल्प अल्पावधीत व उत्कृष्ट गुणवत्तेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

नगराध्यक्षा सौ. अबोली ढोरे यांनी आपल्या मनोगतात, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन ही जलयोजना राबविण्यात आली आहे. भविष्यातही विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सभापती माया अमर चव्हाण यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन पाणीपुरवठा सभापती सुनील गणेश ढोरे यांनी केले.

दरम्यान, या दुहेरी जलशुद्धीकरण प्रकल्पांमुळे वडगाव शहरातील पाणीपुरवठा अधिक नियमित, स्वच्छ आणि शाश्वत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शुद्धीकरण प्रक्रियेने नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, पाणीटंचाईच्या समस्येवरही मोठ्या प्रमाणात मात होणार आहे. परिणामी, वडगाव शहर जलसुरक्षा’च्या दिशेने भक्कम पावले टाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *