क्राईम

मंत्रा सिटी ३६० मध्ये सोसायटी मीटिंगचा राडा; महिलेला धमकी, तिघांवर खुर्ची राॅडने हल्ला


मंत्रा सिटी ३६० मध्ये सोसायटी मीटिंगचा राडा; महिलेला धमकी, तिघांवर खुर्ची राॅडने हल्ला

तळेगाव दाभाडे : शांततेत पार पडणारी सोसायटी मीटिंग अचानक रणांगणात बदलल्याची धक्कादायक घटना मंत्रा सिटी ३६० येथे उघडकीस आली आहे. वेन्डर बदलाच्या मुद्द्यावरून उसळलेल्या वादाने हिंसक वळण घेत, महिलेसह तिघांना मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा प्रकार रविवारी (दि. १५ मार्च २०२६) सायंकाळी सातच्या सुमारास फेज १ मधील क्लब हाऊसमध्ये घडला.

या प्रकरणी विराज खळदे, भावेश खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, चिराग खळदे, महेश खळदे, भुषण खळदे (सर्व रा. खळदे आळी, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) तसेच मतिन (रा. ए विंग, मंत्रा सिटी ३६०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेखा प्रदीप वाघ (वय ५०) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीटिंगदरम्यान फिर्यादींनी सोसायटीचा वेन्डर बदलण्याचा प्रस्ताव मांडला. यावरून आरोपी आक्रमक होत ‘कॉन्ट्रॅक्ट आमचेच’ असा पवित्रा घेत दमदाटी करू लागले. क्षणार्धात वाद पेटला आणि आरोपींनी हेमंत सपकाळ यांच्यावर अचानक झडप घालत मारहाण केली. परिस्थिती सावरण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादी व शांताराम कोकाटे यांनाही खुर्च्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली.

घटनेनंतरही दहशत थांबली नाही. फिर्यादी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात असताना आरोपींनी अश्लील वर्तन करत शिवीगाळ केली. “पुन्हा आमच्या नादी लागलात तर जीव घेऊ,” अशी उघड धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सोसायटी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *