डोळसनाथ महाराज यात्रेतील सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश: तळेगाव पोलिसांची झटपट कारवाई, तीन महिलांना बेड्या
डोळसनाथ महाराज यात्रेतील सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश: तळेगाव पोलिसांची झटपट कारवाई, तीन महिलांना बेड्या
तळेगाव दाभाडे : डोळसनाथ महाराज मंदिराच्या यात्रेतील प्रचंड भाविकगर्दीचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चलाख टोळीचा तळेगाव दाभाडे पोलिसांनी चक्रावून टाकणारा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगिता प्रमोद भदाणे या यात्रेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी दर्शनरांगेत उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत आरोपी महिलांनी संगनमताने त्यांना लक्ष्य केले. गोंधळाच्या वातावरणात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अत्यंत चलाखीने लांबवण्यात आली. काही वेळानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच भदाणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्परतेने तपासचक्रे फिरवली. यात्रास्थळी विशेष शोधमोहीम राबवून संशयास्पद हालचाली करणाऱ्या महिलांवर बारीक नजर ठेवण्यात आली. अखेर तीन महिलांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचा मौल्यवान ऐवज व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोनाली रामदास डुकळे (उर्फ सुनीता सोमनाथ जाधव/सुनीता कार्तिक पवार), वनिला संजय जाधव आणि रेणुका राहुल पवार (सर्व रा. चंदननगर, पुणे) यांचा समावेश आहे. या तिघींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात्रांमध्ये वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना तळेगाव पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता दिलासादायक ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार निळे करीत असून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





