अंतर्मनाच्या शोधासाठी ‘प्रेमगंध विश्व’चे तळेगावात ध्यान शिबिर
अंतर्मनाच्या शोधासाठी ‘प्रेमगंध विश्व’चे तळेगावात ध्यान शिबिर
तळेगाव दाभाडे : वेगवान आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे मानसिक अस्थिरता, भावनिक ताणतणाव आणि नातेसंबंधांमध्ये वाढता दुरावा यांचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक उपक्रम म्हणून प्रेमगंध विश्व यांच्या वतीने एकदिवसीय ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:३० ते रात्री ८:०० या वेळेत हे शिबिर माऊली मंगल कार्यालय ऐश्वर्या हॉटेल समोर माळवाडी तळेगाव दाभाडे येथे पार पडणार आहे.
सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि व्यावसायिक आयुष्यासाठी धडपड करत असतो. इतरांच्या भावना समजून घेताना स्वतःच्या मनातील भावनांकडे मात्र दुर्लक्ष होते. मला कोणी समजून घेत नाही ही भावना अनेकांच्या मनात दाटून येते. आयुष्यात अपेक्षेपेक्षा अधिक मिळालेलं असूनही काहीतरी अपूर्ण राहिल्याची खंत मनाला सतावत राहते. या अंतर्मनातील प्रश्नांची उकल आणि आत्मशोधाचा मार्ग दाखविण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्यांना विविध ध्यान पद्धतींच्या माध्यमातून मानसिक शांतता अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तणावमुक्त जीवनशैली अंगीकारणे, भावनिक संतुलन साधणे आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करणे यावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन, अनामिक भीतीवर मात करण्याचे उपाय, तसेच जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची मानसिक तयारी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, या शिबिरात एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त तंत्रे, व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रेरणा, तसेच शारीरिक व्याधींमध्ये घट होण्यासाठी ध्यानाचा उपयोग कसा होऊ शकतो, याबाबतही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
आयोजकांच्या मते, आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे हीच मोठी गरज बनली आहे. ध्यान ही केवळ साधना नसून ती एक जीवनशैली आहे, जी व्यक्तीला आतून मजबूत बनवते. या उद्देशानेच हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, सर्वांसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे. सहभागींसाठी सायंकाळी ७:३० ते ८:०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९७६३०७०५१६, ९०११६२७२७२, ९५२७८९२५२५ यांसह दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा www.premgandhameditation.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
मनःशांती, आत्मजागर आणि सकारात्मक जीवनाकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हे शिबिर एक महत्त्वाची संधी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.





