उघड्या चेंबरमुळे अपघातांचा धोका ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप
उघड्या चेंबरमुळे अपघातांचा धोका ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप
तळेगाव दाभाडे : शहरातील वतन नगर परिसरात असलेल्या भारत माता उद्यानाजवळील संरक्षण भिंतीलगत उघड्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेले हे चेंबर कोणत्याही मजबूत झाकणाविना उघडेच असल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी मोठा अपघाती धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या ठिकाणी आधीच काही दुचाकीस्वार व पादचारी जखमी झाले असून, विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो. अंधारामुळे चेंबर स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना अचानक अपघाताला सामोरे जावे लागत आहे. परिसरात वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
वतन नगरमधील नागरिकांनी याबाबत अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. चेंबरवर योग्य झाकण बसवून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित असलेल्या या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






