उद्योग

पत्रकार दिनाच्या व्यासपीठावरच पत्रकाराला धमकी


पत्रकार दिनाच्या व्यासपीठावरच पत्रकाराला धमकी

तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे शहरातील नाना भालेराव कॉलनी येथे असलेल्या अनधिकृत हॉटेल ड्रीम लंच’ मध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून मोठ्या थाटामाटात पत्रकार दिन साजरा करण्यात आल्याची घटना सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम चक्क अनधिकृत हॉटेलच्या मालकाने आयोजित केल्याने आणि त्याच व्यासपीठावरून पत्रकाराला अप्रत्यक्ष धमकी दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या कार्यक्रमास शहरातील अनेक माननीय ज्येष्ठ पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना संबंधित हॉटेल मालकाने आपण किती चांगले व्यक्तिमत्व असल्याचे स्वतःच प्रमाणपत्र देत, “मी पत्रकार बांधवांमुळेच आज यशस्वी झालो, समाजात मला ओळख मिळाली, राजकारणात काम करण्याची संधी मिळाली, असे भावनिक वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर “मी कुठे चुकत असेन तर पत्रकारांनी मला सांगावे,असे म्हणत त्यांनी पत्रकारांपुढे नम्रतेचा मुखवटा चढवला.

मात्र याच भाषणात त्यांनी अचानक सूर बदलत, “मला त्रास देणाऱ्यांना मी बघून घेईन, अशी थेट धमकीवजा भाषा वापरली. पत्रकार दिनाच्या मंचावरूनच अशी भाषा वापरली जाणे म्हणजे पत्रकारितेच्या मूल्यांवरच घाला असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

विशेष म्हणजे संबंधित हॉटेल हे पूर्णपणे निवासी भागात असून, इमारतीच्या पार्किंगमध्ये बेकायदेशीरपणे सुरू आहे, हे वास्तव सर्वश्रुत आहे. या अनधिकृत हॉटेलविरोधात एका निर्भीड पत्रकाराने बातमी प्रसिद्ध केली . याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात त्या पत्रकाराला अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य करून धमकी देण्यात आल्याचे नागरिकांचे मत आहे.

धमकी दिली जात असताना उपस्थित इतर पत्रकार बांधवांनी ती भाषा ऐकलीच नाही, किंवा ऐकूनही दुर्लक्ष केले, असा सवालही आता उपस्थित होत आहे. पत्रकारांच्या संरक्षणासाठी साजरा होणारा पत्रकार दिन जर दबाव, भीती आणि गप्प बसण्याचे प्रतीक ठरत असेल, तर हा दिवस साजरा करण्याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेल मालकाने पत्रकारांशी जाणीवपूर्वक मैत्री निर्माण केली असून, आपल्या अनधिकृत हॉटेलविरोधात कोणीही बातमी लावू नये, हाच त्यामागचा मुख्य हेतू असल्याचे बोलले जात आहे. मात्र जेव्हा एखादा पत्रकार चुकीला चुकच म्हणतो आणि बातमी प्रसिद्ध करतो, तेव्हा त्याला धमकी दिली जाते, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक चित्र आहे.

जर हे सर्व राजकीय पाठिंब्याच्या जोरावर घडत असेल, तर आता राजकीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण अशा अनधिकृत व्यवसायिकांमुळेच प्रामाणिक आणि चांगल्या राजकीय नेत्यांची प्रतिमा मलीन होत आहे. पत्रकाराला गप्प बसवण्याचा हा प्रकार थांबवला नाही, तर उद्या सत्य मांडणारा कोणीच उरणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *