मावळ–मुळशी–भोर–राजगडची धुरा विठ्ठलराव शिंदेंकडे; पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
मावळ–मुळशी–भोर–राजगडची धुरा विठ्ठलराव शिंदेंकडे; पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट करण्याच्या दिशेने पक्षाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, मावळ तालुक्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते विठ्ठलराव शिंदे यांची पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अधिकृत नियुक्ती पत्राद्वारे जाहीर केली आहे.
या नियुक्तीमुळे विठ्ठलराव शिंदे यांच्यावर मावळ, मुळशी, भोर आणि राजगड या चार महत्त्वाच्या तालुक्यांची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
विठ्ठलराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले, जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मावळ तालुक्यात पक्षाची घडी बसवण्यात त्यांचा मोठा वाटा असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांना विश्वासार्ह व मार्गदर्शक नेतृत्व म्हणून मान दिला जातो. ते आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणूनही परिचित आहेत.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देताना पक्षवाढीसाठी, संघटन मजबुतीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विठ्ठलराव शिंदे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल आमदार सुनील शेळके यांनी विठ्ठलराव शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “विठ्ठलराव शिंदे हे नेहमीच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत राहिले आहेत. कार्यकर्त्यांशी थेट संवाद, तळागाळातील प्रश्नांची जाण आणि पक्षाशी निष्ठा ही त्यांची बलस्थाने आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मावळसह मुळशी, भोर आणि राजगड तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार अधिक वेगाने होईल.”
विठ्ठलराव शिंदे यांच्या नियुक्तीमुळे पुणे ग्रामीण राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.





