शहरसामाजिक

वेगाच्या स्पर्धेतही पत्रकारितेची मशाल तेवत ठेवणारे बाळशास्त्री जांभेकर : गिरीश खेर यांचे प्रतिपादन


वेगाच्या स्पर्धेतही पत्रकारितेची मशाल तेवत ठेवणारे बाळशास्त्री जांभेकर : गिरीश खेर यांचे प्रतिपादन

तळेगाव दाभाडे :
आजच्या डिजिटल व वेगवान युगात माध्यमांची स्वरूपे बदलत असली, तरी पत्रकारितेचे मूलभूत मूल्य अजूनही अबाधित आहे. हे मूल्य टिकवून ठेवण्याचे श्रेय आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जाते, असे प्रतिपादन देवराई संस्थेचे संस्थापक व माजी उपनगराध्यक्ष गिरीश खेर यांनी केले. तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि. ६) मयुरेश डायनिंग हॉल येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, शाखा मावळचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, सल्लागार योगेश्वर माडगूळकर, कार्याध्यक्ष काकासाहेब काळे, उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, सचिव डॉ. संदीप गाडेकर, खजिनदार अंकुश दाभाडे, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, माजी अध्यक्ष महेश भागीवंत, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, मयुर सातपुते, अमित भागीवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक जगन्नाथ काळे यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार आमिर खान यांनी पत्रकारांची सद्यस्थिती, माध्यमांवरील ताणतणाव तसेच पत्रकाराने कोणती भूमिका बजावावी यावर सखोल मार्गदर्शन केले.

गिरीश खेर पुढे म्हणाले, “पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसून तो समाजाचा आरसा आहे. सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांमुळेच पत्रकारितेचा विश्वास टिकून आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेल्या मूल्यांची आजही गरज आहे.”

श्रीकृष्ण पुरंदरे यांनी पत्रकारांनी जागल्याची भूमिका अधिक जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन केले. जागरूक आणि संवेदनशील पत्रकारच समाजाला न्याय देऊ शकतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, त्याची भूमिका अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात मयुरेश डायनिंग हॉल यांच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव भेगडे म्हणाले, “लोकशाही बळकटीकरणात पत्रकारांचे योगदान अमूल्य आहे. पर्यावरण संरक्षण, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, प्रशासनातील त्रुटी समाजासमोर मांडण्याचे धैर्य पत्रकार दाखवतात. या जबाबदारीची जाणीव ठेवून पत्रकारांनी अधिक जोमाने काम केले पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा भेगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंकुश दाभाडे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *