मावळच्या मातीतून मुंबईच्या सत्तेत. मावळचा सुपुत्र मुंबईत नगरसेवक
मावळच्या मातीतून मुंबईच्या सत्तेत. मावळचा सुपुत्र मुंबईत नगरसेवक
मुंबई :राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी दिनांक १५ रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज दिनांक १६ रोजी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सकाळपासूनच राज्याचे राजकारण तापले आहे. कुठे गुलाल उधळला जातोय तर कुठे पराभवाची छाया गडद होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले असताना, मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे सर्वाधिक कुतूहलाने पाहिले जात आहे. मुंबईचा कौल म्हणजे राज्याच्या राजकीय दिशेचा आरसा मानला जातो, त्यामुळे प्रत्येक प्रभागाचा निकाल महत्त्वाचा ठरत आहे.
मुंबईकडे देशाचे लक्ष असले तरी मावळ तालुक्यातील जनतेचे लक्ष मात्र मुंबईतील एका विशिष्ट प्रभागावर खिळले होते. मावळचा लेक मुंबईच्या रणांगणात काय करतो, याची उत्सुकता गावागावात चर्चेचा विषय बनली होती. अखेर त्या प्रतीक्षेचा शेवट गोड बातमीने झाला असून, मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक ४ मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविणारे मंगेश पांगारे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
मंगेश पांगारे हे मूळचे मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील पारिठेवाडी गावचे सुपुत्र. सामान्य कुटुंबातून पुढे येत मुंबईच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या पांगारे यांनी मेहनत, संघटनकौशल्य आणि जनसंपर्काच्या जोरावर हा विजय खेचून आणला आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत त्यांनी आघाडी घेत विरोधकांना पिछाडीवर टाकले आणि अखेर निर्णायक विजयाची घोषणा होताच प्रभाग क्रमांक ४ मध्ये जल्लोषाला उधाण आले.
या विजयामुळे पारिठेवाडी गावासह संपूर्ण मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावोगावी फटाक्यांचा आवाज, मिठाई वाटप आणि अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. मावळचा लेक मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पोहोचल्याचा अभिमान प्रत्येक मावळवासियाच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
विशेष म्हणजे मुंबई डबेवाल्यांच्या वतीने मुंबई महानगरपालिकेत प्रथमच नगरसेवक होण्याचा बहुमान मंगेश पांगारे यांनी मिळविला आहे. कष्टकरी वर्गाचा आवाज थेट पालिकेपर्यंत पोहोचणार असल्याची भावना यामुळे बळावली आहे. शिवसेना भाजपा युतीचे विजयी उमेदवार म्हणून पांगारे थेट सत्ताधारी बाकावर विराजमान होणार असून, मुंबईच्या कारभारात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, तो मावळच्या मातीतून उगवलेल्या नेतृत्वाच्या ताकदीचा संदेश देणारा आहे. मुंबईच्या राजकारणात मावळचा ठसा उमटला असून, येत्या काळात मंगेश पांगारे यांच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मावळचा लेक जिंकला आहे, आणि हा विजय मावळच्या जनतेचा मान उंचावणारा ठरला आहे.





