शहरसामाजिक

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत विषय समित्यांसाठी हालचालींना वेग. सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच


तळेगाव दाभाडे नगर परिषदेत विषय समित्यांसाठी हालचालींना वेग. सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच

 

 

तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील विषय समित्यांच्या निवडणुका येत्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता असून, त्यानिमित्ताने नगर राजकारणात हालचालींना वेग आला आहे. सभापतीपद आणि महत्त्वाच्या समित्यांवर स्थान मिळविण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. बैठका, सल्लामसलत, गटचर्चा आणि अंतर्गत समन्वय यामुळे नगर परिषद परिसर सध्या राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरला आहे.

 

नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड तसेच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सर्व नगरसेवकांचे लक्ष विषय समित्यांच्या रचनेकडे लागले आहे. प्रत्यक्ष शहर कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या समित्यांवर सदस्यत्व आणि विशेषतः सभापतीपद मिळविणे हे राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे मानले जाते. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून रणनीती आखली जात आहे.

 

तळेगाव दाभाडे नगर परिषद ‘ब’ वर्गात समाविष्ट असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विषय समित्यांची सदस्यसंख्या ठरविली जाणार आहे. यासाठी विभागीय आयुक्तांकडून सभेला मान्यता मिळाल्यानंतर विशेष सभा बोलावली जाणार आहे. या सभेत समित्यांची रचना, सदस्यनियुक्ती आणि सभापतीपदावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

स्थायी समिती व्यतिरिक्त नगर परिषदेत एकूण सहा विषय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण-क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती, स्वच्छता-वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती, नियोजन व विकास समिती तसेच महिला व बालकल्याण समिती यांचा समावेश आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि शहर विकासाशी थेट निगडित विषय या समित्यांच्या माध्यमातून हाताळले जाणार असल्याने या समित्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, गटनेते इंद्रकुमार ओसवाल व गटनेत्या हेमलता खळदे यांच्यातील चर्चेनंतर समित्यांचे गठन होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली आहे. सत्ताधारी गटात अंतर्गत समतोल राखणे, तर विरोधकांना योग्य प्रतिनिधित्व देणे, या मुद्द्यांवर विचार सुरू असल्याचे समजते.

 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनापूर्वीच सभापती आणि सदस्यांची निवड पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर विकासकामांना गती मिळेल, प्रशासन अधिक कार्यक्षम होईल आणि नगर परिषदेच्या कामकाजाला स्पष्ट दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नगरसेवकांची भूमिका, राजकीय गणिते आणि अंतिम निर्णय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *