सामाजिक

तळेगावात गोल्डन रोटरी चा स्त्रीशक्ती गौरव सोहळा दिमाखात


तळेगावात गोल्डन रोटरी चा स्त्रीशक्ती गौरव सोहळा दिमाखात

तळेगाव दाभाडे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला सलाम करत रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्रीशक्ती गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजसेवा, आरोग्य, क्रीडा, प्रशासन आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करून त्यांच्या कार्याला गौरवमंडित करण्यात आले.

कार्यक्रमात वडगाव नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ अबोली मयुर ढोरे, समाजसेविका अर्चनाताई म्हाळसकर, राष्ट्रीय खेळाडू स्वास्ती नाईक, आशा सेविका राणी ताई चुकाटे, एमआयएमईआर रुग्णालयातील नर्स वैशाली लोंढे तसेच तळेगाव आरटीओ कार्यालयातील रमिताताई गुडगेरी यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या महिलांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना उभे राहून दाद दिली.

या सोहळ्यात सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत चिखले ऐकवा यांच्या तर्फे ठाकर वस्तीतील पाच गरजू महिलांना वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले. स्वच्छ पाण्याची उपलब्धता ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण वस्तीतील महिलांच्या दैनंदिन जीवनात आरोग्यसुरक्षेचा नवा किरण निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात साक्षी जयकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान किती व्यापक आहे यावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रशांत ताये यांनी प्रभावी व ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांना खिळवून ठेवले.

रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी आपल्या मनोगतात महिला सशक्तीकरण ही केवळ संकल्पना नसून समाजपरिवर्तनाची शक्ती असल्याचे नमूद केले. महिलांच्या शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनासाठी रोटरी क्लबमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाचा विकास अपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष ललित देसले यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भविष्यातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी व समाजोपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली. विशेषतः आशा सेविकांचा सहभाग लक्षणीय होता. अध्यक्षा सौ. अनिताताई भेगडे याही कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले. रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सेक्रेटरी प्रदीप टेकवडे यांनी उपस्थित मान्यवर, महिला तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

स्त्रीशक्तीचा गौरव, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि प्रेरणेचा नवा संदेश देणारा हा सोहळा तळेगावात महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा अविस्मरणीय उत्सव ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *