सामाजिक

लोहगडावर महाशिवरात्रीची जय्यत तयारी रौप्यमहोत्सवी वर्षात उत्सवाला विशेष रंग


लोहगडावर महाशिवरात्रीची जय्यत तयारी रौप्यमहोत्सवी वर्षात उत्सवाला विशेष रंग

 

लोहगड (मावळ ): ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या लोहगड किल्ल्यावर यंदा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ फेब्रुवारी रोजी पारंपरिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रात्री ९ वाजता लोहगड येथील मारुती मंदिरात लोहगड, घेरेवाडी व भाजे येथील भजनी मंडळांच्या सहभागातून हरिजागर होणार आहे. त्यानंतर पहाटेपासूनच गडावर धार्मिक वातावरण दाटणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता महादेव मंदिरात अभिषेक सोहळा होणार असून, तळेगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) तसेच पंचायत समिती सदस्य सौ. रेश्माताई देवकर यांच्या हस्ते विधी पार पडणार आहे.

 

सकाळी ९ वाजता लोहगड गावातून श्री शिवाजी उदय मंडळ लोहगड यांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात शिवपालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. महिलांकडून घरोघरी रांगोळ्या काढून शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण केले जाणार आहे. फुलांची सजावट आणि सडा-रांगोळीने परिसर सुशोभित केला जाणार असून, सकाळी १० वाजता शिवस्मारकावर शिववंदनेने अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर पालखी गडावरील शिवमंदिरात दर्शनासाठी प्रस्थान करेल. उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

यंदा लोहगड विसापूर विकास मंचाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत लोहगड किल्ल्याचा समावेश झाल्याने उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दुग्धशर्करा योगामुळे असंख्य ग्रामस्थ, शिवभक्त व मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे व अध्यक्ष विश्वास दौंडकर यांनी दिली.

 

दरम्यान, मंचाच्या २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण दुर्गसंवर्धन कार्यामुळे लोहगड आज नव्या दिमाखात उभा आहे. मुख्य दरवाजाला बसविण्यात आलेला भक्कम सागवानी दरवाजा, तटबंदी व बुरुजांची दुरुस्ती, पायऱ्यांचे पुनरुज्जीवन तसेच दिशादर्शक फलकांची उभारणी ही कामे भारतीय पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने पूर्ण झाली आहेत. शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि पायथ्याशी उभारलेले भव्य शिवस्मारक हे लोकसहभागातून साकार झाले आहे.

 

उत्सवाच्या निमित्ताने शिवस्मारक परिसरात भविष्यात भव्य ‘शिवसृष्टी’ उभारण्याची संकल्पना पुढे राबविण्याचा निर्धार मंचाने व्यक्त केला आहे. धार्मिक उत्साहासोबतच दुर्गसंवर्धनाचा संदेश देणारा हा उत्सव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *