सामाजिक

किल्ले लोहगड व किल्ले विसापूरवर महाशिवरात्र उत्साहात साजरी ढोल-ताशा अभिषेक व जयघोषाने सह्याद्री दुमदुमला


किल्ले लोहगड व किल्ले विसापूरवर महाशिवरात्र उत्साहात साजरी

ढोल-ताशा अभिषेक व जयघोषाने सह्याद्री दुमदुमला

 

मळवली (मावळ) : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक किल्ले लोहगड आणि किल्ले विसापूर या दुर्गांवर यंदाची महाशिवरात्र पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड-विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

 

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भाजे, लोहगड आणि घेरेवाडी येथील भजनी मंडळांच्या वतीने हरिजागराचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि अभंगांच्या सुरेल गायनात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. लोहगडावरील महादेव मंदिरात मावळ पंचायत समिती सदस्या सौ. रेश्माताई राजुभाऊ देवकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

 

लोहगड गावातून ढोल-ताशा, हलगी-तुतारीच्या पारंपरिक गजरात शिवपालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढून महिलांनी पालखीचे औक्षण केले. फुलांची आरास, सडा-रांगोळी आणि दीपसजावटीने शिवस्मारक परिसर उजळून निघाला होता. शिववंदना आणि पुष्पवृष्टीद्वारे शिवस्मारकाला अभिवादन करण्यात आले. ‘हर हर महादेव’ आणि ‘जय शिवराय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

 

कार्यक्रमास तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोषभाऊ दाभाडे पाटील, रा. स्व. संघाचे प्रकाशराव मिठभाकरे, संदीपभाऊ जाधव, नगरसेवक सूरज सातकर, नितीन आप्पा बारणे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सोनालीताई बैकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था उद्योजक चंद्रकांत भन्साळी यांच्या वतीने करण्यात आली होती.

 

दरम्यान, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. लोहगड-विसापूर विकास मंचाला २५ वर्षे पूर्ण झाल्याचा दुग्धशर्करा योग जुळून आल्याची भावना मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे आणि अध्यक्ष विश्वास दौंडकर यांनी व्यक्त केली. शिवस्मारक परिसरात साजेशी आणि भव्य ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

विसापूर किल्ल्यावरही महाशिवरात्र मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. शिवमंदिरात अभिषेक, आरती आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक रांगोळी व फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला होता. पाटण गावातील लहान-थोर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

 

लोहगड-विसापूर विकास मंचाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत विसापूरवरील पडलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक परंपरेचा संगम साधत लोहगड व विसापूरवरील महाशिवरात्र उत्सवाने दुर्गसंवर्धनाच्या कार्याला नवी ऊर्जा दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *