गोरगरीबांच्या मोफत अंत्यविधीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे बजेट तरतुदीची मागणी
गोरगरीबांच्या मोफत अंत्यविधीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे बजेट तरतुदीची मागणीश
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील गोरगरीब नागरिकांचा अंत्यविधी नगरपरिषदेमार्फत मोफत करण्यात यावा आणि त्यासाठी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी, अशी मागणी माजी . नगरसेवक अरुण बबनराव माने यांनी मुख्याधिकारी,गिरिश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून, आयुष्यभर विविध करांच्या माध्यमातून नगरपरिषदेला योगदान देतात. मात्र, काही कुटुंबांची परिस्थिती इतकी हलाखीची असते की, घरातील व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधीचा खर्च करणेही त्यांना जड जाते. अशा परिस्थितीत नगरपरिषदेकडून मोफत अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे अरूण माने यांनी नमूद केले आहे.
तळेगाव शहरातील स्मशानभूमीत नगरपरिषदेमार्फत विद्युत दाहिनी चालवली जाते. या दाहिनीच्या देखभालीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. या खर्चामध्ये आवश्यक ती वाढ करून गोरगरीब नागरिकांसाठी अंत्यविधी मोफत करता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत नसून सर्वसामान्य व दुर्बल घटक मोठ्या संख्येने शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन नगरपरिषदेकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच तळेगावातील सर्व नगरसेवकांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, या विषयावर एकमताने ठराव मंजूर करून शहरातील गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा. अंत्यविधीसारख्या संवेदनशील व मानवी विषयावर राजकारण न करता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या मागणीमुळे शहरात सामाजिक जबाबदारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका यावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, आगामी अर्थसंकल्पात याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





