सामाजिक

घोरवडेश्वर डोंगरावर महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेव चा गजर.लाखो शिवभक्तांचा उसळला महापूर


घोरवडेश्वर डोंगरावर महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेव चा गजर.लाखो शिवभक्तांचा उसळला महापूर

देहुरोड : मावळ तालुक्यातील घोरवडेश्वर डोंगरावर महाशिवरात्रीनिमित्त लाखो शिवभक्तांचा जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. हर हर महादेव ओम नमः शिवाय बम बम भोले’च्या अखंड जयघोषात संपूर्ण डोंगररांग भक्तीमय झाली होती. रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याने पहाटेपर्यंत डोंगर परिसर गजबजून गेला होता.

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर पहाटे प्राचीन शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला. वेदमंत्रांच्या गजरात विधीवत पूजाअर्चा करून महाआरती संपन्न झाली. या प्रसंगी घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार, अभिजीत (टायगर) भेगडे, बोडके महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

घोरवडेश्वरचे शिवलिंग अतिप्राचीन व जागृत मानले जात असल्याने येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. यंदाही त्याला अपवाद नव्हता. मावळ तालुक्यासह परिसरातील गावांमधून तसेच पुणे-मुंबई भागातूनही हजारो भक्तांनी हजेरी लावली. डोंगर चढताना आणि पायथ्याशी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रतिष्ठानतर्फे फराळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच दर्शनरांगेचे नियोजन करण्यात आले होते. सर्व शिवभक्तांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे.अशी माहिती अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी दिली तसेच
आदेश सेवा मंडळाच्या वतिने मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या देखील घोरवडेश्वर डोंगरावर सन्मान करण्यात आला.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डोंगरावर तसेच पायथ्याशी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे उत्सव शांततेत व भक्तीभावात पार पडला.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने घोरवडेश्वर डोंगरावर उसळलेला हा शिवभक्तांचा महासागर मावळच्या धार्मिक परंपरेचे आणि श्रद्धेचे दैदिप्यमान दर्शन घडवून गेला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *