सामाजिक

तळेगाव दाभाडेत श्रीराम नवमी निमित्त भव्य अयोध्या राम मंदिर प्रतिकृती; फ्रेंड्स क्लबचा आकर्षक देखावा लक्षवेधी


तळेगाव दाभाडेत श्रीराम नवमी निमित्त भव्य अयोध्या राम मंदिर प्रतिकृती; फ्रेंड्स क्लबचा आकर्षक देखावा लक्षवेधी

तळेगाव दाभाडे : शहरातील कलाप्रेमी वृत्ती आणि सामाजिक उपक्रमांसाठी ओळख असलेल्या फ्रेंड्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्त एक आकर्षक व भव्य देखावा साकारत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंडळाने अयोध्या येथील श्रीराम मंदिराची देखणी प्रतिकृती उभारून धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण केले आहे.

दरवर्षी विविध हिंदू धर्मीय सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे करण्याची परंपरा जपणाऱ्या या मंडळाने यंदाही आपल्या कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा प्रत्यय दिला आहे. विशेष म्हणजे, या देखाव्याची निर्मिती मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या व्यवसाय, उद्योग आणि नोकरीतील व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अत्यंत मेहनतीने व निष्ठेने केली आहे. त्यांच्या एकजुटीमुळे आणि सर्जनशीलतेमुळे उभारलेली ही प्रतिकृती अत्यंत सुंदर आणि वास्तवदर्शी ठरली आहे.

या देखाव्यामुळे तळेगाव दाभाडे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीसमोर भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत असून परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

फ्रेंड्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, श्रीराम नवमीच्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या या भव्य प्रतिकृतीला अवश्य भेट द्यावी आणि या धार्मिक उत्सवाचा आनंद लुटावा.

मंडळाच्या या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतनाचा संदेशही प्रभावीपणे दिला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *