महत्त्वाचे

थकबाकीदारांवर तळेगाव नगरपरिषदेचा बडगा: तीन व्यावसायिक मालमत्ता सील


थकबाकीदारांवर तळेगाव नगरपरिषदेचा बडगा: तीन व्यावसायिक मालमत्ता सील

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर, पाणीपट्टी कर तसेच गाळा भाडे थकवणाऱ्या मिळकतधारकांवर नगरपरिषदेने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील थकीत कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने विशेष मोहीम सुरू केली असून, त्याअंतर्गत गुरुवारी (दि. ५ मार्च) तीन व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात आल्या.

नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळा भाडे मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. त्यामुळे प्रलंबित महसूल वसूल करण्यासाठी कर संकलन विभागाने सक्त वसुली मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून कर थकवणाऱ्या व्यावसायिक मिळकतींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

आज करण्यात आलेल्या कारवाईत तीन व्यावसायिक मालमत्ता कर संकलन विभागामार्फत सील करण्यात आल्या. थकबाकीदारांनी वारंवार सूचना देऊनही कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सील करण्यात आलेल्या मालमत्तांमुळे शहरातील इतर थकबाकीदारांमध्येही खळबळ उडाली आहे.

नगरपरिषदेच्या महसुलात वाढ होण्यासाठी मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळा भाडे वेळेवर भरणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. कराच्या माध्यमातूनच शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती आदी मूलभूत सेवा प्रभावीपणे पुरविता येतात. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून थकीत कर तत्काळ भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच ज्या मिळकतधारकांकडे अद्याप थकबाकी बाकी आहे, त्यांनी विहित मुदतीत मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व गाळा भाडे भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे. अन्यथा थकबाकीदारांविरोधात मालमत्ता सील करणे, जप्तीची कारवाई करणे आदी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, सदर कारवाई कर संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली. आगामी काळातही थकबाकीदारांवर अशाच प्रकारे कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे थकबाकीदारांनी तत्काळ कर भरण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *