महत्त्वाचे

आळंदी घाटावर मद्यप्राशनाला मूक पाठबळ? सुरक्षारक्षकांवर गंभीर आरोप; नागरिकांमध्ये संताप


आळंदी घाटावर मद्यप्राशनाला मूक पाठबळ? सुरक्षारक्षकांवर गंभीर आरोप; नागरिकांमध्ये संताप

आळंदी : पवित्र समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर सध्या सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षकच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटावर बाहेरून येणारे तसेच स्थानिक काही नागरिक उघडपणे मद्यपान करत असून, त्यांना रोखण्याऐवजी सुरक्षारक्षकांकडूनच मदत केली जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या ठिकाणाची पवित्रता धोक्यात आली आहे. घाटावर मद्यपींना प्रवेशबंदी करावी, अशी ठाम मागणी स्थानिकांनी केली आहे.

काही वर्षांपूर्वी याच घाट परिसरात मद्यपान आणि गांजाच्या नशेत असलेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेची आठवण ताजी असताना पुन्हा तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेळीच कारवाई न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते,असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे तसेच स्थानिक पोलीस प्रशासन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. घाटावरील बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवून कडक नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तातडीने कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आळंदीच्या पवित्रतेसाठी ठोस पावले उचलली जाणे अत्यावश्यक बनले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *