पवनानगर बाजार पेठेत वेगवान डंपर चा कहर; प्रशासनाचे मौनव्रत नेमकं कशासाठी?
पवनानगर बाजार पेठेत वेगवान डंपर चा कहर; प्रशासनाचे मौनव्रत नेमकं कशासाठी?
पवनानगर(मावळ) : गजबजलेल्या पवनानगर बाजारपेठेत दिवस असो वा रात्र, माती वाहून नेणाऱ्या डंपर गाड्यांचा बेफाम वेग नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अरुंद रस्ते, वाढती वर्दळ आणि त्यात भर म्हणून वेगाने धावणारे डंपर यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, आतापर्यंत अनेक किरकोळ तसेच गंभीर अपघात घडले असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विशेषतः स्पीड ब्रेकर बसवण्यासंदर्भात वारंवार मागणी करूनही ती फाइलांच्या धुळीतच अडकलेली दिसते. आणखी किती अपघातांची वाट पाहत आहात? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याहूनही धक्कादायक बाब म्हणजे पोलीस यंत्रणाही या प्रकरणात निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही विशेष मोहीम राबवली जात नसल्याने डंपर चालकांचा बेदरकारपणा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, बाजारपेठेत व्यवसाय करणारे व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक धास्तावलेल्या अवस्थेत वावरत आहेत.नागरिकांनी पवनानगर ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून तक्रारी नोंदवल्या आहेत. स्पीड ब्रेकर बसवणे, वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे यांसारख्या मागण्या स्पष्टपणे मांडण्यात आल्या. मात्र, या सर्व पत्रांचा प्रत्यक्षात काहीच परिणाम दिसून आलेला नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच पेरणी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावली आहे.
यासंदर्भात बोलताना पवनानगर येथील व्यावसायिक अजित कुंभार म्हणाले, आम्ही रोज जीव मुठीत धरून व्यवसाय करतो. ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने तातडीने स्पीड ब्रेकर बसवून डंपरच्या वेगावर नियंत्रण आणले पाहिजे.या रस्त्याचा वापर शेतकरी, कामगार, विद्यार्थी . पर्यटक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर करतात, त्यामुळे कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, व डंपर च्या जीवघेण्या वेगा पासुन नागरिकांची सुटका करवी अशी मागणी अजित कुंभार, राहुल जव्हेरी, अक्षय बुटाला, विलास वरघडे, सुनील भातांगळे, यांनी केली आहे





