डासदंशाचा विळखा तळेगावातील नागरिकांची धूरफवारणीसाठी नगरपरिषदेकडे आर्त मागणी
डासदंशाचा विळखा तळेगावातील नागरिकांची धूरफवारणीसाठी नगरपरिषदेकडे आर्त मागणी
तळेगाव दाभाडे : शहरातील घोरावडी रेल्वे स्टेशन परिसर, कुंभारवाडा. भेगडे आळी, निळकंठ नगर तसेच भोई आळी या भागांत सध्या डासांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढत्या उकाड्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने होत असल्याने डेंगू, मलेरिया आणि हत्तीरोगासारख्या आजारांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील नागरिकांनी तळेगाव नगरपरिषदेकडे तातडीने धूरफवारणी व औषध फवारणी करण्याची मागणी केली आहे.
घोरावडी रेल्वे स्टेशन परिसरात गटारांमध्ये साचलेले पाणी, उघडी गटारे आणि दुर्लक्षित स्वच्छता व्यवस्थेमुळे डासांचे ‘उत्पत्तीस्थान’ तयार झाले आहे. कुंभारवाडा भेगडे आळी, निळकंठ नगर आणि भोई आळी परिसरातही अशीच परिस्थिती असून सायंकाळच्या वेळेस डासांचा अक्षरशः थैमान दिसून येत आहे. घराबाहेर बसणे तर दूरच, घरातही डासांपासून बचाव करणे नागरिकांसाठी कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे शहरातील भोई आळी परिसरात नुकताच क्यूलेक्स जातीच्या मादी डासाच्या चाव्यामुळे हत्तीरोगाचा रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संभाव्य संसर्गजन्य आजारांचा धोका अधिकच वाढल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने परिस्थिती गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, डासांची वाढ रोखण्यासाठी नियमित धूरफवारणी, औषध फवारणी तसेच स्वच्छतेची प्रभावी मोहीम राबविणे आवश्यक आहे. विशेषतः डास उत्पत्तीची केंद्रे ठरलेली उघडी गटारे, साचलेले पाणी त्वरित हटविण्याची गरज आहे. तसेच वस्त्यांमध्ये आरोग्य जनजागृती मोहीमही राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वाढत्या डासप्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले असून संभाव्य साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





