गोल्डन रोटरी पिंकेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वच्छ व हरित तळेगावासाठी पुढाकार
गोल्डन रोटरी पिंकेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वच्छ व हरित तळेगावासाठी पुढाकार
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोल्डन रोटरी पिंकेथॉन 2026’ या उपक्रमाला तळेगाव शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. महिला सक्षमीकरण, आरोग्य जागरूकता आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला.
कार्यक्रमादरम्यान तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) यांनी स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव आणि हरित तळेगाव घडवण्यासाठी महिलांनी पुढे यावे, असे आवाहन केले. महिलांनीही जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर स्वच्छतेत सक्रिय सहभागाची तयारी दर्शवली.
या प्रसंगी नगरसेविका संगीताकाकी खळदे, आशाताई भेगडे, शैलजाताई काळोखे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी, प्रकल्प प्रमुख डॉ. धनश्री काळे, डिस्ट्रीक्ट टीममधील दीपक फल्ले, किरण ओसवाल, दीक्षा वाईकर, मेधा शिंदे, सुजाता देव आणि कविता खोल्लम उपस्थित होते.
कार्यक्रमात सिने अभिनेत्री प्रियंका हांडे यांनी तळेगावातील महिलांची आरोग्याविषयीची जागरूकता पाहून समाधान व्यक्त केले. येथील महिलांचा उत्साह आणि सहभाग प्रेरणादायी आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच रोटरी डिस्ट्रिक्टच्या डीजी इलेक्ट चारू श्रोत्री यांनी गोल्डन रोटरीच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत अशा कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली.
महिलांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल अध्यक्ष संतोष परदेशी यांनी सर्व सहभागी महिलांचे आभार मानले. पुढील वर्षीही याच उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आलेले सुरेश रजानी यांनी आगळ्या-वेगळ्या वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणजे समारोपानंतर सर्व मान्यवर आणि सदस्यांनी स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. अल्पोपहारानंतर निर्माण झालेला कचरा नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, अभिनेत्री प्रियंका हांडे आणि रोटरी सदस्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्वरित साफ केला. त्यामुळे स्वच्छता हीच सेवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.
यावेळी २० लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. संकेत सारीज मानाच्या पैठणीच्या विजेत्या सुरेखा आप्पासाहेब रुपनवर आणि श्रेया बाविस्कर ठरल्या. तसेच चिखले एक्वा फिल्टरच्या विजेत्या अमृता संदीप पाटील आणि साई कम्युनिकेशनच्या भेटवस्तूंच्या विजेत्या स्वागती नवनाथ घारे व सुषमा खोत यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत ताये यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन रोटरॅक्टचे अध्यक्ष ललित देसले आणि गोल्डन रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘गोल्डन रोटरी पिंकेथॉन 2026’ हा उपक्रम तळेगावच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक चळवळीला नवी दिशा देणारा ठरला आहे.





