क्राईम

लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई:२२ जण अटकेत, रोख रक्कम व आलिशान गाड्यांसह ४९ लाख जप्त


लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई:२२ जण अटकेत, रोख रक्कम व आलिशान गाड्यांसह ४९ लाख जप्त

लोणावळा :
लोणावळा शहरातील कुणेनामा परिसरात सुरू असलेल्या ‘हाय-प्रोफाईल’ जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी टाकलेल्या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २२ जणांना रंगेहात पकडण्यात आले असून, रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि आलिशान गाड्यांसह ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. २१ मार्च २०२६) पहाटे पावणे पाचच्या सुमारास कुणेनामा (ता. मावळ) येथील एका आलिशान बंगल्यावर ही कारवाई करण्यात आली. करण पाटील या इसमाने हा बंगला भाड्याने घेऊन तेथे बेकायदेशीर जुगाराचा अड्डा सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी हनुमंत एकनाथ थोरबोले (रा. वरसोली, ता. मावळ) याच्यासह एकूण २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार मयुर आबनावे यांच्या फिर्यादीनुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

छाप्यावेळी बंगल्यात दोन टेबलांवर ‘फ्लॅश’ (तीन पत्ती) हा जुगार रंगात आला होता. अचानक पोलिसांनी धाड टाकताच आरोपींची पळापळ उडाली. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल तसेच सहा आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
विशाल रामदास काळे (नवी मुंबई), अक्षय शंकर शेडगे (नवी मुंबई), अजित राजकुमार पंचवाणी (उल्हासनगर), अक्षय मानसिंग मोहिते (नवी मुंबई), इम्रान सलीम शेख (नवी मुंबई), अकबर शफी हुसेन (मुंबई), जहूर सल्लाउद्दीन अन्सारी (नवी मुंबई), रंगनाथ कारभारी औटी (नवी मुंबई), मुकेश सत्यनारायण यादव (मुंबई), बजरंग शामलाल गुप्ता (नवी मुंबई), महादेवन आर. के. (नवी मुंबई), नावेद जिगर मेमण (मुंब्रा, ठाणे), जितेंद्र उत्तम परदेशी (दिघी, पुणे), रवी बिपीन सोनपाल (नाशिक), रमणलाखन यादव (उलवे, रायगड), गुरुदेव भीमराव जाधव (मुंबई), हरिओम कुमार रामबिरसिंग (वांद्रे, मुंबई), आकाश भगवती प्रसाद (वांद्रे, मुंबई), रंजना गायसी (पणजी, गोवा), चंदा मगर (पणजी, गोवा), मिनुका मोहरजन (पणजी, गोवा) आणि हनुमंत एकनाथ थोरबोले (वरसोली, ता. मावळ).

या कारवाईमुळे लोणावळा परिसरातील अवैध जुगार व्यवसायाला मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. उच्चभ्रू भागात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत असून, या जुगार अड्ड्यामागील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *