क्राईम

लोणावळ्यात दुचाकी चोरांचा पर्दाफाश: दोन अटकेत, सहा गाड्या जप्त


लोणावळ्यात दुचाकी चोरांचा पर्दाफाश: दोन अटकेत, सहा गाड्या जप्त

लोणावळा :
पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असतानाच लोणावळा शहर पोलिसांनी चपळ तपास मोहीम राबवत दोन संशयितांना अटक करून दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लोणावळ्यातील दोन तसेच पुणे परिसरातील चार अशा एकूण सहा दुचाकी चोरीच्या घटनांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेल्या सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

मयुरेश अनंत ढेरे (वय ३६, सध्या रा. स्वराज्य नगर, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. कसबा पेठ, पुणे) आणि रामदास खंडू दुंडे (वय ३०, सध्या रा. स्वराज्य नगर, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. पेनूर, ता. लोहा, जि. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नांगरगाव आणि खात्रीपार्क परिसरात मागील आठवड्यात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरीच्या मालिकेमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवली.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीतील हालचालींचा बारकाईने अभ्यास करत संशयितांच्या हालचालींची साखळी जोडण्यात आली. याच धाग्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले. प्रारंभी चौकशीत आरोपींनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसी चौकशीचा पारा वाढताच त्यांनी चोरीची कबुली दिली.

चौकशीत आरोपींनी लोणावळ्यातील दोन तसेच पुणे परिसरातील आणखी चार दुचाकी चोरी केल्याची माहिती उघड केली. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत चोरीस गेलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या. चोरीच्या गाड्या विक्रीस काढण्याच्या तयारीत आरोपी असल्याचीही माहिती तपासात पुढे आली आहे.

दरम्यान, शहरात वाढत्या वाहनचोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुचाकी पार्क करताना सुरक्षित कुलूपबंद व्यवस्था करावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *