आरोग्य

कान्हे उपजिल्हा रुग्णालय भव्य इमारत.अपुरी सेवा नागरिकांच्या अपेक्षांना तडा


कान्हे उपजिल्हा रुग्णालय भव्य इमारत.अपुरी सेवा नागरिकांच्या अपेक्षांना तडा

कान्हे (मावळ) : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागासाठी मोठा आधार ठरण्याची अपेक्षा असलेल्या कान्हे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे वास्तव मात्र अपेक्षाभंग करणारे ठरत आहे. अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा या आश्वासनांवर उभारलेले हे रुग्णालय प्रत्यक्षात मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे नागरिकांसाठी केवळ नवीन इमारत ठरत असल्याची तीव्र भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

भव्य आणि आधुनिक वास्तू उभी असली तरी आरोग्यसेवेची गुणवत्ता मात्र जुन्याच चौकटीत अडकलेली दिसून येते. नागरिकांच्या मते, रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व तांत्रिक कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांच्या तपासण्या, निदान प्रक्रिया आणि उपचार यामध्ये विलंब होत असून, अनेकांना प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे.

विशेष म्हणजे, तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे अद्याप रिक्त असल्याने उपलब्ध डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर होत आहे. परिचारिकांची अपुरी संख्या आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे रुग्णांच्या देखरेखीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत ही त्रुटी अधिक गंभीर ठरत आहे.

आपत्कालीन विभागात आवश्यक मनुष्यबळ आणि आधुनिक उपकरणांची कमतरता असल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. अनेकदा रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवावे लागते, ज्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन जीविताचा धोका वाढतो. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

दंतचिकित्सा विभागातही अत्याधुनिक उपचारांची सुविधा नसल्याचे समोर आले आहे. रूट-कॅनलसारख्या आवश्यक उपचारांसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याने रुग्णांना केवळ दात काढण्याचा पर्याय दिला जातो. परिणामी, पुढील उपचारांसाठी नागरिकांना खाजगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

औषधसाठा आणि प्रयोगशाळा सेवांमध्येही त्रुटी असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. प्रयोगशाळा तपासण्यांमध्येही विलंब होत असल्याने उपचार प्रक्रियेवर परिणाम होत आहे.

दरम्यान, सोनोग्राफी सेवा केवळ आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि बुधवार उपलब्ध असल्याने त्या दिवशी रुग्णांची प्रचंड गर्दी होते. अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे.

कान्हे उपजिल्हा रुग्णालय हे अंदर मावळसह परिसरातील अनेक गावांसाठी प्रमुख आरोग्य केंद्र आहे. मोठी रुग्णालये दूर असल्याने नागरिकांचा मुख्य आधार याच रुग्णालयावर आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत अपेक्षित सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरणे, आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देणे आणि रुग्णालयातील सेवा सुरळीत करणे अत्यावश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *