क्राईम

देहूरोड पोलिसांची धडक कारवाई : अवैध कत्तल प्रकरणी सात जण गजाआड, ४०० किलो मांस जप्त


देहूरोड पोलिसांची धडक कारवाई : अवैध कत्तल प्रकरणी सात जण गजाआड, ४०० किलो मांस जप्त

देहूरोड: शहरातील अवैध कत्तल व मांस विक्रीवर देहूरोड पोलिसांनी मोठी कारवाई करत शितळानगर येथील थॉमस कॉलनी परिसरात छापा टाकून सात जणांना अटक केली. या कारवाईत तब्बल ५ लाख ८० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सुमारे ४०० किलो मांस, एक टेम्पो तसेच सत्तूर, चाकू यांसारखी धारदार हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.

ही कारवाई गुरुवारी (दि. २एप्रिल ) सकाळी साडेआठच्या सुमारास पार पडली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी अवैधरित्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पथक तयार करून छापा टाकला. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्याचा पर्दाफाश करताना पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मांस साठवून ठेवलेले आढळून आले.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये हसन कुरेशी (६०), इरफान कुरेशी (३२), शाहरुख कुरेशी (३३), नवीन रेशी (३२), इफ्तिकर कुरेशी (३८), मोहम्मद चकोली (३५) आणि फारूक कुरेशी (५५) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार प्रशांत वाबळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात काही दिवसांपासून अवैध कत्तलीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली.

छाप्यामध्ये जनावरांची कत्तल करून विक्रीसाठी तयार ठेवलेले मांस टेम्पोमध्ये भरलेले आढळले. तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी साधनेही पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत असून, या अवैध साखळीमागील इतर संबंधितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *