क्राईम

देहूरोडमध्ये गांजाची मोठी खेप जप्त; सोसायटी पार्किंगमध्येच सौदा उधळला


देहूरोडमध्ये गांजाची मोठी खेप जप्त; सोसायटी पार्किंगमध्येच सौदा उधळला

देहूरोड:
देहूरोड परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहारावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे. मामुर्डी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या या आरोपींकडून सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा २१ किलो ३३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे देहूरोड व परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप गोंडाचे यांनी फिर्याद दिली असून देहूरोड पोलीस ठाण्यात ओमकार हरी इंगवले आणि आयुष राजेंद्र भट (दोघे रा. पुणे जिल्हा) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात किशोर नावाचा एक आरोपी (रा. मुंबई) अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी हा गांजा मुंबईहून विक्रीसाठी आणला होता. मामुर्डी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये ग्राहकांना गांजा पुरवला जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने सापळा रचत संशयित वाहन व हालचालींवर लक्ष ठेवले. ठरलेल्या वेळेत आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.

या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत असून, फरार आरोपीचा शोध, गांजाचा पुरवठा साखळी, तसेच या व्यवहारामागील इतर सहभागींची माहिती मिळवण्यावर भर देण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. “रहिवासी सोसायटीच्या पार्किंगमध्ये अशा प्रकारचा गैरव्यवहार होतो, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे एका रहिवाशांनी सांगितले. तर दुसऱ्या नागरिकाने, “तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी कडक कारवाईसोबत जनजागृतीही गरजेची आहे, अशी मागणी केली. काही रहिवाशांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि गस्त वाढवण्याचीही सूचना केली आहे.

या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांचा कडक पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *