क्राईम

टाकवेतील हुक्का तंबाखू कारखान्यावर FDA ची धाड ३१ कोटींची ऐतिहासिक कारवाई


टाकवेतील हुक्का तंबाखू कारखान्यावर FDA ची धाड ३१कोटींची ऐतिहासिक कारवाई

टाकवे बुद्रुक (मावळ) : महाराष्ट्र राज्यात पूर्णतः प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई करत मावळ तालुक्यातील टाकवे गावातील मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीवर धाड टाकली. या कारवाईत तब्बल ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून संपूर्ण कारखाना सील करण्यात आला आहे.

ही कारवाई २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजता FDA च्या विशेष भरारी पथकाने केली. सहायक आयुक्त (अन्न), भंडारा पथकप्रमुख यदुराज दहातोंडे यांच्या आदेशानुसार ही तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान सहायक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी तसेच पंच साक्षीदार उपस्थित होते.

यापूर्वी १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या हुक्का फ्लेवर्ड तंबाखूच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटीन आढळून आले होते. अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार हे उत्पादन अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ तसेच आयुक्त, अन्न सुरक्षा, महाराष्ट्र राज्य यांच्या १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेचे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीदरम्यान टाकवे येथील आस्थापनेत तंबाखू, ग्लिसरीन, फ्रुक्टोज, साखर सिरप व विविध फ्लेवर्स वापरून ‘Afzal Authentic Flavoured Hookah’ या नावाने उत्पादन सुरू असल्याचे आढळले. या कारवाईत ५,४८,४८८ किलो वजनाचा साठा जप्त करण्यात आला असून त्यात ११६ प्रकारचे तयार पदार्थ, १८ प्रकारचा कच्चा माल व १८ प्रकारचे फ्लेवर्स यांचा समावेश आहे.

कारवाईनंतर संपूर्ण आस्थापना सील करून चाव्या FDA च्या ताब्यात देण्यात आल्या. याप्रकरणी अनिल कुमार चौहान (सहव्यवस्थापक), संचालक असिफ फाजलानी, फैजल फाजलानी व कंपनीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, वडगाव मावळ पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सहव्यवस्थापक अनिल चौहान यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास ८ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.मावळ तालुका हळूहळू प्रतिबंधित व अंमली पदार्थांच्या साठवणुकीचा व विक्रीच्या केंद्रबिंदू बनत आहे. FDA व पोलिसांनी केलेली ही कारवाई स्वागतार्ह असून भविष्यातही अशा कारवाया सातत्याने व्हायला हव्यात. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *