शिक्षण-प्रशिक्षण

दुर्गम वेल्हवळीची वाघीण उड्डाणाला सज्ज; प्रतीक्षा थोरातची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड


दुर्गम वेल्हवळीची वाघीण उड्डाणाला सज्ज; प्रतीक्षा थोरातची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड

वेल्हवळी (मावळ):
मावळ तालुक्यातील दुर्गम डोंगरकपारीत वसलेल्या वेल्हवळी गावातून उंच भरारी घेणारी यशकथा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रतीक्षा थोरात हिची मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह पदावर निवड झाल्याने गावकऱ्यांमध्ये अभिमानाची लाट उसळली आहे.

या यशानिमित्त वेल्हवळी गावात तिचा जंगी सत्कार सोहळा पार पडला. मावळ तालुक्यातील मान्यवर, ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रतीक्षेवर कौतुकाचा वर्षाव झाला. ग्रामीण मातीतून उमललेल्या या यशस्वी कथेने अनेक तरुणांना नवी दिशा दिली आहे.

सत्कारावेळी प्रतीक्षा थोरात हिने आपल्या मनोगतातून संघर्षमय प्रवास उलगडला. आर्थिक अडचणी, दुर्गम भागातील शिक्षणाची मर्यादा आणि स्पर्धेचा कठीण टप्पा पार करत तिने हे यश मिळवले असल्याचे ती म्हणाली. तिच्या प्रत्येक शब्दातून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास झळकत होता.

या भावनिक क्षणी प्रतीक्षेच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आपल्या मुलीने गाठलेल्या या यशशिखरामुळे त्यांनी अभिमान व्यक्त केला. गावकऱ्यांनीही तिच्या धाडसाला सलाम करत वाघीण अशी उपमा देत तिचा गौरव केला.

प्रतीक्षाच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने सोने झाले असून तिची कहाणी प्रेरणादायी ठरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हा मंत्र अंगीकारत प्रतीक्षाने आपली वाट स्वतः घडवली. तिच्या यशामागे याच विचारांची ताकद असल्याचेही यावेळी अधोरेखित झाले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रतीक्षा थोरात ही आशेचा किरण बनली असून तिचे यश म्हणजे जिद्दीचे प्रतीक ठरत आहे. पुढील वाटचालीसाठी मावळ दर्पण न्यूज व परिवाराकडून प्रतिक्षा ला हार्दिक शुभेच्छा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *