शिक्षण-प्रशिक्षण

आपल्या कचऱ्याचे व्यवस्थापन आपणच करायचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांचे प्रतिपादन


आपल्या कचऱ्याचे व्यवस्थापन आपणच करायचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांचे प्रतिपादन

तळेगाव दाभाडे:
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक कर्तव्यभावना आहे. आपल्या कचऱ्याचे व्यवस्थापन आपणच करायचे हा स्वच्छतेचा मंत्र नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी विद्यार्थिनींना दिला. Savitribai Phule Pune University अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने Savitribai Phule Mahila Mahavidyalaya येथे आयोजित शून्य कचरा व्यवस्थापन या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत परिसरासाठी निर्मल वारी हा उपक्रम कसा राबवला याचा अनुभव कथन करताना संतोष दाभाडे यांनी सुरुवातीच्या अडचणी, लोकजागृतीची गरज आणि प्रशासन नागरिक यांच्यातील समन्वय यावर प्रकाश टाकला. ठरवलेले ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास अशक्यही शक्य होते.असे सांगत त्यांनी निर्मल वारी च्या यशामागील टीमवर्कची कहाणी उलगडली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज पंढरपूरची वारी अधिक स्वच्छ, सुलभ आणि पर्यावरणपूरक झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कौशल्य विकास योजनेअंतर्गत शून्य कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थिनींना घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीची सवय लावण्याचे आवाहन केले. घर स्वच्छ असेल तर लक्ष्मी नांदते, या प्रभावी शब्दांत त्यांनी स्वच्छतेचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमास ॲड. विनय दाभाडे उपस्थित होते. मी याच संस्थेचा माजी विद्यार्थी असून इथूनच घडलो, याचा अभिमान वाटतो. असे सांगत त्यांनी संतोष दाभाडे यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे होते. त्यांनी निर्मल वारी प्रकल्पाबद्दल संतोष दाभाडे यांचे कौतुक करत स्वच्छतेच्या उपक्रमांसाठी संस्थेच्या वतीने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव प्रा. वसंत पवार यांनी केले. प्रभारी प्राचार्य डॉ. माधुरी चंदनशिव यांनी शून्य कचरा संकल्पनेचे महत्त्व विशद करत महाविद्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ कसबे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. माधवी शेटे यांनी करून दिला, तर आभार विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. योगिता शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *