उद्योग

वाकसाईत लोखंडी सळईंचा काळाबाजार उघडकीस; लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, १३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त


वाकसाईत लोखंडी सळईंचा काळाबाजार उघडकीस; लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, १३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा :
मावळ तालुक्यातील मौजे वाकसाई येथे बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला आणि संशयास्पदरीत्या वाहतूक होत असलेला लोखंडी सळईंचा साठा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठ्या कारवाईत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात सहा इसमांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. मौजे वाकसाई गावाच्या हद्दीत शितल ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही इसम कंटेनर ट्रकमधून लोखंडी सळई उतरवून त्या दुसऱ्या वाहनात भरत असल्याचे तसेच हा माल चोरीचा असल्याचा संशय असल्याचे कळविण्यात आले. माहितीची शहानिशा करत पोलिसांनी पंचांसह तात्काळ छापा टाकला.

छाप्यादरम्यान शितल ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आयसर टेम्पो (एमएच १६ सीडी ५१९८) उभा असल्याचे आढळून आले. या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडी सळई भरलेली असून सहा इसम आपले अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न करताना आढळले. पोलिसांनी सर्वांना घटनास्थळीच ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुसय्यद मोहम्मद इस्माईल शेख (२९), सनीदेओल रामअवतार राजभर (३२), हाकीनुर अब्दुल गणी सा (३८), अकलेश कुमार रामानंद राजभर (२८), सनीराज उर्फ रविंद्र रामतोल राजभर (१९) आणि पवन उर्फ अजयकुमार सोमई राजभर (१९) यांचा समावेश असून हे सर्व मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी आरोपींकडे लोखंडी सळईंबाबत विचारपूस केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. मालाबाबत बिल, पावती किंवा मालकी हक्क दर्शविणारी कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरल्याने सदर सळई चोरीची असल्याचा ठोस संशय बळावला. तपासात आरोपी चोरी व तत्सम गुन्ह्यांतून उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे सहा टन वजनाच्या लोखंडी सळईंसह आयसर टेम्पो असा एकूण १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *