उद्योग

लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा चौथरा उंचावण्याची मागणी; मनसेचे नगराध्यक्षांना निवेदन


लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा चौथरा उंचावण्याची मागणी; मनसेचे नगराध्यक्षांना निवेदन

लोणावळा:

लोणावळा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारकाचे काम सध्या लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम अत्यंत सुबक, कलात्मक व ऐतिहासिक वारशाला साजेसे होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, या स्मारकाच्या रचनेबाबत एक महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला असून, अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोणावळा शहराच्या वतीने नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वाराची (मेन गेट) उंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची यामध्ये तफावत आढळून येत आहे. प्रत्यक्ष पाहणीत असे निदर्शनास आले की, समोरून पाहताना मेन गेटमुळे महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्पष्टपणे दिसून येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचे व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांचा अश्वारूढ पुतळा चारही बाजूंनी नागरिकांना, शिवप्रेमींना व पर्यटकांना स्पष्टपणे दिसला पाहिजे, अशी भावना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यासाठी पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची तातडीने वाढवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

चौथऱ्याची उंची योग्य पद्धतीने वाढविल्याशिवाय स्मारकाच्या उद्घाटनाची घाई करू नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे व मुख्याधिकारी (सीओ) यांच्यासमवेत स्मारकाची पाहणी करण्यात आली.

ही पाहणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले व मावळ तालुका उपाध्यक्ष अमित भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी लोणावळा शहर उपाध्यक्ष दिनेश कालेकर, सुनील सोनवणे, आकाश सावंत, श्रेयस कांबळे, जुबेर मुल्ला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या वतीने सन्मान करण्यात आला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *