उद्योग

आश्रम शाळा की अत्याचार शाळा कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींला अमानुष मारहाण


आश्रम शाळा की अत्याचार शाळा कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींला अमानुष मारहाण

 

कामशेत : शिक्षणाच्या पवित्र मंदिरातच निर्दयतेचा काळा डाग उमटल्याची धक्कादायक घटना कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत उघडकीस आली आहे. सकाळच्या व्यायामासारख्या किरकोळ कारणावरून एका महिला कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलींना छडीने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे साडेसातच्या सुमारास आश्रमशाळेच्या वस्तीगृहात ही घटना घडली. वस्तीगृहातील केवळ १२ वर्षांच्या निरागस मुलींच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सारिका दीपक पाटील या महिला कर्मचाऱ्यांनीच या मुलींवर छडीचा मारा करत अमानुष वर्तन केल्याचे उघड झाले आहे. व्यायाम का केला नाही? या क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात आरोपी सारिका पाटील हिने मुलींच्या हातांवर छडीने वार करत दुखापत केली.

या घटनेने संरक्षण या शब्दालाच तडा गेला असून, आश्रमशाळेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार अनिता अभिमन्यू देवरे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित आरोपीकडून यापूर्वीही मुलींना वारंवार त्रास देण्यात येत होता. काही प्रसंगी मुलींचे डोके भिंतीवर आपटण्यासारखे गंभीर प्रकार घडल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची भीषणता अधिक अधोरेखित होत आहे.या पूर्वी देखील संबंधित महिला आरोपी अल्पवयीन मुलींना मारहाण करत होती त्यावेळी आश्रम शाळेचे संचालक झोपले होते का ?असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे

या सर्व प्रकारामुळे बालहक्कांचा उघडपणे भंग झाल्याची भावना व्यक्त होत असून, मानसिक व शारीरिक छळाची परिसीमा गाठल्याचा आरोप करण्यात येत आहे. निष्पाप मुलींवर होणाऱ्या या अत्याचाराने पालकवर्ग हादरला असून, आश्रमशाळा की अत्याचारशाळा? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, कामशेत पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी सारिका पाटील हिच्या विरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यानुसार अल्पवयीन मुलांवर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि इतर संभाव्य बाबींचा शोध घेतला जात आहे. या प्रकारामुळे आश्रमशाळांमधील देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा बालसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला असून, शिक्षणासोबत संवेदनशीलतेची शिकवण कधी मिळणार? असा प्रश्न समाजमनात घोंगावत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *