काळोखेवाडीतील ओढ्यालगतचा रस्ता खचला अपघाताचा धोका वाढला, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
काळोखेवाडीतील ओढ्यालगतचा रस्ता खचला अपघाताचा धोका वाढला, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
तळेगाव दाभाडे :
येथील काळोखेवाडी परिसरात ओढ्यावर असलेला महत्त्वाचा रस्ता अलीकडेच खचल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. सदर रस्ता दैनंदिन वर्दळीचा असून शाळकरी विद्यार्थी, कामगार, दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र रस्ता खचल्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या ठिकाणापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर लोकप्रतिनिधींचे वास्तव्य आहे. तरीही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असून रस्त्याचा मोठा भाग वाहून जाण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ पाहणीपलीकडे काहीच हालचाल झालेली नाही. तातडीने संरक्षक कठडे उभारणे, रस्त्याची दुरुस्ती करणे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना राहुल काळोखे म्हणाले, हा रस्ता आमच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या धोक्याचा सामना करावा लागत आहे. एखादा अपघात झाल्यानंतर जाग येण्यापेक्षा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा, हीच नागरिकांची मागणी आहे.





