उद्योग

तळेगाव दाभाडेमध्ये मॉडीफाय सायलेन्सर बुलेटस्वारांवर कडक कारवाईची मागणी


तळेगाव दाभाडेमध्ये मॉडीफाय सायलेन्सर बुलेटस्वारांवर कडक कारवाईची मागणी

तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहरात मागील काही महिन्यांपासून मॉडीफाय सायलेन्सर लावलेल्या बुलेट दुचाकींचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्री-अपरात्री तसेच वर्दळीच्या वेळेत या दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि लहान मुलांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा बुलेटस्वारांवर तात्काळ आणि कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तळेगाव दाभाडे हे शिक्षण, उद्योग आणि वसाहतींचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडे काही तरुणांकडून आपल्या दुचाकी बुलेटला कायदेशीर नियम धाब्यावर बसवून मॉडीफाय सायलेन्सर बसवले जात आहेत. या सायलेन्सरमुळे होणारा प्रचंड आवाज केवळ ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरत नाही, तर रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका देखील वाढतो.

विशेषतः सकाळी व रात्री शहरातील अंतर्गत रस्ते, वसाहती, चौक आणि मुख्य मार्गांवरून हे बुलेटस्वार जोरजोरात गाडी चालवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी रुग्णालयांच्या परिसरातही असा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार अशा प्रकारचे सायलेन्सर पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

नागरिकांनी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. केवळ दंड आकारून सोडून देण्याऐवजी वाहन जप्त करणे, सायलेन्सर काढून टाकणे आणि परवाना निलंबित करणे यासारख्या कठोर उपाययोजना कराव्यात.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवासी संघटनांकडून केली जात आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून लवकरच विशेष मोहिम राबवून मॉडीफाय सायलेन्सर असलेल्या दुचाकींवर कारवाई केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील शांतता, सुरक्षितता आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी ही कारवाई तातडीने आणि सातत्याने करणे गरजेचे असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *