महत्त्वाचे

विसापूर गडाच्या दक्षिण कातळात प्राचीन लेणीचा शोध:इतिहासाच्या नव्या दालनाचे उघडले दरवाजे


विसापूर गडाच्या दक्षिण कातळात प्राचीन लेणीचा शोध:इतिहासाच्या नव्या दालनाचे उघडले दरवाजे

मळवली, प्रतिनिधी : मावळच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या विसापूर गडाने पुन्हा एकदा इतिहास संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गडाच्या उत्तर बाजूस नुकतेच प्राचीन भुयार सापडल्यानंतर आता दक्षिणेकडील कातळात अर्धवट कोरलेली एक प्राचीन लेणी आढळून आली आहे. या नव्या शोधामुळे विसापूर गडाच्या इतिहासात आणखी एका महत्त्वपूर्ण स्थापत्याची भर पडली असून, या परिसरातील प्राचीन मानवी वस्ती आणि धार्मिक-सांस्कृतिक घडामोडींवर नव्याने संशोधन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मावळातील सफर ३६९ किल्ल्यांची’ या सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य मालेवाडी परिसरातील प्राचीन वनदेव मंदिराच्या दर्शनासाठी गेले असताना दाट झाडीच्या आड लपलेली ही रचना त्यांच्या नजरेस पडली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ही रचना नैसर्गिक नसून मानवनिर्मित प्राचीन लेणी असल्याचे स्पष्ट झाले. या शोधाची माहिती इतिहास अभ्यासकांपर्यंत पोहोचविल्यानंतर प्राथमिक निरीक्षणातही या लेणीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले. विशेष म्हणजे, आजपर्यंत ही लेणी सर्वसामान्यांसह अनेक भटक्यांच्या नजरेतूनही सुटली होती.

लेणीच्या अंतर्भागात दोन कोरीव पाण्याच्या टाक्या आणि विश्रांतीसाठी तयार करण्यात आलेला स्वतंत्र कक्ष आढळून आला आहे. एक टाके आकाराने लहान असून ते सध्या कोरडे आहे, तर दुसऱ्या मोठ्या टाक्यात अजूनही पाणीसाठा आहे. जमिनीपासून सुमारे चार फूट उंचीवर कोरलेला विश्रांती कक्ष त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देतो. लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ सापडलेले खापराचे तुकडे या परिसरात मानवी वस्ती अथवा नियमित वापर झाल्याचे संकेत देत असून, पुढील संशोधनासाठी ते महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात.

इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी सांगितले की, या लेणीचे खोदकाम अपूर्ण अवस्थेत थांबलेले दिसते. दुष्काळ, महामारी, आर्थिक संकट किंवा इतर काही अपरिहार्य कारणांमुळे हे काम थांबविण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. कातळावर प्रथम सीमारेषा आखून त्यानंतर खोदकाम करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. तसेच पावसाचे पाणी बाहेर वाहून जाईल आणि आतील भाग कोरडा राहील, अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे. त्यामुळे त्या काळातील स्थापत्य नियोजनाची प्रगल्भता अधोरेखित होते.

विसापूर गडावर अलिकडच्या काळात होत असलेल्या सलग ऐतिहासिक शोधांमुळे या दुर्गाचा अभ्यास अधिक व्यापक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पुरातत्त्व विभागाने या लेणीचे सविस्तर सर्वेक्षण करून संवर्धनाची प्रक्रिया हाती घ्यावी, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि दुर्गसंवर्धकांकडून होत आहे. हा शोध मावळच्या समृद्ध इतिहासातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकणारा ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *